Lok Sabha Election 2024 : महिला आयोगाच्या कार्यालयाचा अजित पवार गटाच्या प्रचारासाठी वापर, काँग्रेसचा आरोप
महिलांवर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच अजित पवार गटाच्या प्रचाराचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी ही मागणी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे, महिला आयोगाच्या कार्यालयातच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी पक्ष प्रचाराचे काम करून पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे.पक्ष प्रचाराचे काम वरिष्ठाच्या दबावाखाली करावे लागत आहे का, हे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले पाहिजे. चाकणकर या दडपणाखाली पक्ष प्रचाराचे काम करत असतील तर ते अयोग्य व चुकीचा पायंडा पाडणारे व असंवैधानिक आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जे कार्यालय आहे त्या कार्यालयातून राजकीय प्रचाराचे काम व्हायला नको. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून रुपाली चाकरणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असल्याचे संध्याताई सव्वालाखे यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List