शिरूरमध्ये चोरांचा धुमाकूळ, सविंदणे येथील हाडकी परिसरातील रोहित्र पुन्हा चोरीला
शिरूर तालुक्यातीच्या पश्चिम भागातील कवठे येमाई,सविंदणे या गावासह बेट भागात सुमारे वर्षभरापासून ट्रान्स्फॉर्मर (डीपी) चोरट्यांनी सातत्याने वीज रोहित्रे चोरुन परिसरात अक्षरश: थैमान घातले आहे. तब्बल तीनशेच्यावर रोहित्रे चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नुकतेच सविंदणे येथील पूर्व नरवडे मळ्यातील हाडकी परिसरातील रोहित्र पुन्हा चोरीला गेले आहे.विद्युत रोहित्र यांच्या चोऱ्या थांबण्याऐवजी दिवसेंदिवस त्या वाढतच चालल्या आहेत.मागे चोरीस गेलेल्या रोहित्र चोऱ्यांचा तपास अद्यापही लागला नसून चोऱ्या वाढतच चालल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी,नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र कडक बंदोबस्त आहे. तरीही चोऱ्या होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तर सविंदण्यात पुन्हा रोहित्र चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे ? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. शिरूर तालुक्यात चोरटयांनी जवळपास तीनशे विद्युत रोहित्र चोरून महावितरण विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे.विद्युत डी पी सातत्याने चोऱ्या होत असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना वेळेवर विद्युत रोहित्र मिळत नसल्याने कॅनाल, नदीद्वारे पाणी आलेले असतानाही शेतीला पाणी देता येत नसल्याने कडक ऊन्हामुळे डोळ्यादेखत ऊस, मका, तरकारी पिके आदी शेतीमाल होरपळून शेतकरी अडचणीत आले आहेत. रोहित्र चोरीला गेल्यावर महिनो अन् महिने ते मिळत नाही. परंतु त्या काळातील त्याचेही बिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे.यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली पाहिजेत अशी मागणी होत आहे.
‘डिंभे धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अत्यंत केविलवाणी अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झाली असून लाखो रुपयांची कर्जे काढून शेती टिकविण्याचा जागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List