सोन्या-चांदीची तेजी विक्रमी टप्प्यावर, सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या; चांदीही 82 हजारांवर
सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्याने सोने खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आगामी काळात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शेअर बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि डॉलरच्या किंमतीचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो.
सोन्याच्या दराने 70 हजाराचा टप्पा पार केला असून आता ते 71 हजार प्रति 10 ग्रॅम या दरावर पोहचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तसेच आता गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आणि लग्नसराई यामुळे सोन्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे सराफा बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत. तसेच चांदीची मागणीही वाढल्याने चांदीचे दरही वाढले आहेत. चांदीचे दर किलोसाठी 82 हजारावर गेले आहेत.
सध्या सराफा बाजारात 10 ग्रॅम शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याची किंमत रुपये 71,050 रुपये आहे. याआधी याची किंमत 70,670 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. आता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याचांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोमवारी सराफा बाजारात चांदी 82,050 रुपये प्रति किलो आहे. याआधी चांदीची किंमत 81,140 रुपये प्रतिकिलो होती. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 65,010 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,920 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 65,010 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 70,920 रुपये असेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List