विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना जीवदान; वन विभाग, ग्रामस्थांनी केली सुटका
शिरूर तालुक्यातील घोडनदी किनारी असलेल्या निमगाव दुडे येथील दाते वस्तीनजीक भक्ष्याच्या शोधात आलेले दोन कोल्हे रविवारी विहीरीत पडले होते. विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जिवदान देण्यात शिरूर वनविभागाला यश आले आहे.
रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निमगाव दुडे येथील शेतकरी बाळासाहेब दाते विहीरीवर गेले असता त्यांना दोन कोल्हे विहीरीमध्ये पडलेले दिसले. याबाबत त्यांनी तात्काळ शिरूर वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर तातडीने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही विहीर खोल असून त्यात पाणी असल्याने कोल्ह्यांना लवकर बाहेर काढणे गरजेचे होते. त्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने कार्यवाही करण्यात आली. वनरक्षक नारायण राठोड, वनपाल गणेश पवार, वन कर्मचारी हनुमंत कारकुड यांनी अरुण रावडे, वैभव पानगे, विजय दंडवते, बाळासाहेब दाते, हसन मुजावर या स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कोल्हांना विहीरीतून शिताफीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त संचारासाठी सोडण्यात आले. या दोन्ही कोल्ह्यांना जीवदान देण्यात ग्रामस्थांनी वनविभागाला मोलाचे सहकार्य केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List