डीप क्लीनिंग…102 मेट्रिक टन कचरा गोळा; 634 किलोमीटर लांबीचे रस्ते केले स्वच्छ, 1 हजार 555 कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिका राबवत असलेल्या डीप क्लीनिंग मोहिमेत गेल्या महिनाभरात 102 मेट्रिक टन राडारोडा, 70 मेट्रिक टन कचरा, 25 मेट्रिक टन टाकाऊ मोठय़ा वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 634 किलोमीटर लांबीचे रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत. 1 हजार 555 कामगार- कर्मचाऱ्यांनी 175 संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे.
पालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी 6 एप्रिल रोजी व्यापक स्वरूपात सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीनिंग ड्राईव्ह) राबविण्यात आली. या विशेष मोहिमेअंतर्गत रस्ते-पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, राडारोडामुक्त परिसर, धोकादायक तारा यांचे जाळे हटवणे आदी कार्यवाही करण्यात आली. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेत मुंबईतील कानाकोपऱ्यातील, लहानसहान गल्लीबोळातील राडारोडा, कचरा उचलण्यासह स्वच्छतेची इतरही कार्यवाही होत असल्याने मुंबईकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या भागात राबवली स्वच्छता मोहीम
शनिवारी मोहिमेत परिमंडळ-1 मधील विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, ऑपेरा हाऊस जंक्शन, चर्नी रोड स्थानक, मौलाना अब्दुल कलाम आझाद मार्ग; परिमंडळ-2 मध्ये दादासाहेब फाळके मार्ग; परिमंडळ-3 मध्ये खेरनगर मार्ग, विवान उद्यान मार्ग; परिमंडळ-4 मध्ये स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, सोमवार बाजार, आर. टी. ओ. मार्ग; परिमंडळ-5 मध्ये विठ्ठल नारायण पुरव मार्ग, अणुशक्ती नगर, अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता, असल्फा आणि साकीनाका मेट्रो स्थानक; परिमंडळ- 6 मध्ये अमृत नगर, घाटकोपर पश्चिम, स्वामिनारायण चौक, हिरानंदानी जोड मार्ग, कैलास संकुल, महात्मा फुले मार्ग, विद्यालय मार्ग; परिमंडळ-7 मध्ये एम. के. बेकरी परिसर, मुख्य कार्टर मार्ग, नवीन जोड रस्ता कांदिवली, कांदिवली मेट्रो स्थानक यासह विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List