Lok Sabha Election 2024 : तुरुंगात टाकले तर… रोहीत पवार यांचा एकनाथ खडसेंना टोला
तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, अशी भाजपला धमकी देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. ”खडसेंना जर तुरुंगात टाकलं तर त्यांची प्रकृती खालावू शकते. त्यामुळे प्रकृतीच्या काळजीने ते भाजपमध्ये जात असतील’, अशा शब्दात त्यांनी खडसेंना टोला लगावला आहे.
”अजित पवार यांच्यासह काही जण गेले. त्यांच्यापैकी काहींना पदे मिळाली. मात्र त्यांनाही ब्लॅकमेल करण्यात आले होते. त्यांच्या फाईल्स काढल्या जातील अशा धमक्या देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपा बरा, या अनुषंगाने ते भाजपाबरोबर गेले. तसेच खडसेंनाही ब्लॅकमेल केलेले असावे. जर एकनाथ खडसे यांना तुरुंगामध्ये टाकले असते तर त्यांच्या आरोग्याची परिस्थिती खालावली असती. त्या काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा”, असे रोहित पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेटही घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तबच झाले. आता लवकर त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त होणार आहे. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेते गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येणार अशी चिन्हे आहे. कारण या दोन नेत्यांमधील जाहीर वाद अनेकदा चव्हाटय़ावर आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List