दिल्लीतून चोरी झाली; जेपी नड्डांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार मोदींच्या मतदारसंघात सापडली
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची चारचाकी गाडी दिल्लीतून चोरी गेली होती. दिल्लीतून चोरी झालेली ही गाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सापडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटकही केली आहे.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष JD Nadda यांची पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार गेल्या महिन्यात चोरी झाली होती. दिल्लीतील गोविंदपुरी भागातील एका सर्व्हिंस सेंटरमधून 19 मार्च रोजी ही कार चोरी झाली होती. चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत कसून तपास सुरू केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बडखल भागात राहणाऱ्या शाहिद आणि शिवांग त्रिपाठी यांना या एसयूव्ही कारच्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी क्रेटा कारमध्ये बसून चोरी करण्यासाठी आले होते. जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरी केल्यानंतर बडखल येथे नेली आणि तिथे नंबरप्लेट बदलली. नंबरप्लेट बदलल्यानंतर आरोपींनी कारसह अलिगढ, लखीमपूर खीरी, बरेली, सीतापूर, लखनऊ मार्गे वाराणसी गाठली. ही कार नागालँडला पाठवण्याचा डाव आरोपींचा होता.
Delhi Police recover stolen SUV of BJP chief JP Nadda’s wife; two held
Read @ANI Story | https://t.co/0dYglBip6r#DelhiPolice #Nadda #BJP pic.twitter.com/tXyogKjqt2
— ANI Digital (@ani_digital) April 7, 2024
19 मार्चला झाली चोरी
जेपी नड्डा यांची पत्नी मल्लिका नड्डा यांची फॉर्च्युनर कार चालक जोगिंदर यांनी दिल्लीतील गोविंदपूर येथील सर्व्हिस सेंटरमध्ये नेली होती आणि इथूनच कारची चोरी झाली. याप्रकरणी जोगिंदर यांनी पोलिसात फिर्यादही दाखल केली होती. सर्व्हिस सेंटरमध्ये कार पार्क केल्यानंतर जोगिंदर हे जेवणासाठी घरी गेले, मात्र माघारी आल्यावर कार जाग्यावर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नीची कार चोरी झाल्याने पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ही कार शेवटची गुरुग्राम येथे दिसून आली होती.
राजकीय टीका
दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्नीची कार चोरी झाल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळातही गाजला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी ट्विट केले होते. ‘संपूर्ण देशाची सत्ता हाती असलेल्या महाशक्तीच्या सर्वोच्च नेत्याच्या पत्नीचीच गाडी चोरीला जात असेल तर दिल्ली पोलिसांचा वापर काय फक्त शेतकऱ्यांना अडवण्यासाठी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला ताब्यात घेण्यासाठीच केला जातोय का? यावरून हेही स्पष्ट होतं की, जिथं महाशक्तीच्या मुखियाच्या पत्नीचीच गाडी सुरक्षित नाही तिथं देश कसा सुरक्षित राहणार?’ असे रोहित पवार यांनी आपल्या X वरील पोस्टमधून म्हटले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List