अमेरिकेत हे काय चाललंय? पुन्हा एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू
हिंदुस्थानातील शेकडो विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. परंतु, अमेरिकेत शिकणाऱया विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेतील ओहायोमध्ये आणखी एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिंदुस्थानी दूतावासाने शनिवारी ही माहिती दिली. या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दूतावासांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी विद्यार्थी उमा सत्य साई गड्डे याचा ओहायोमध्ये मृत्यू झाला आहे. आम्ही कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहोत. विद्यार्थ्याचा मृतदेह लवकरात लवकर हिंदुस्थानात पोहोचावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र विद्यार्थ्याचा मृतदेह कधी आणि कुठे सापडला हे दूतावासाने सांगितले नाही.
समीर कामथ या विद्यार्थ्याचा 4 फेब्रुवारी 2024 रोजी एका उद्यानात मृतदेह सापडला होता. त्याआधी 2 फेब्रुवारीला 19 वर्षीय श्रेयस रेड्डीचा मृत्यू, 7 फेब्रुवारीला विवेक तनेजा, 20 जानेवारीला अकुल धवनचा मृत्यू, 16 जानेवारीला विवेक सैनीचा मृत्यू, 28 जानेवारीला नील आचार्यची इंडियाना राज्यात हत्या झाली होती.
3 महिन्यांत 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू
20 मार्च रोजी अमेरिकेत एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले होते. हैदराबादमध्ये राहणाऱया त्याच्या वडिलांकडे अपहरणकर्त्यांनी सुमारे एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. त्याच्या मृत्यूचा संशय व्यक्त केला जात आहे. 25 वर्षीय अब्दुल मोहम्मद ओहायो येथील क्लीव्हलँड विद्यापीठात मास्टर्सचे शिक्षण घेत होता. मे 2023 मध्ये तो अमेरिकेला गेला होता. अमेरिकेत गेल्या 3 महिन्यांत 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हिंदुस्थानी पालकांमध्ये चिंता पसरली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List