कॉलेजमधील सर्व मुली आपल्यावर ‘फिदा’; अजब आजाराने तरुण भंडावला
कॉलेजमध्ये शिकण्यासोबत प्रेम करण्याचे हे वय असते. अनेक जण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. परंतु चीनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाला असे वाटतेय की, वर्गातील सर्व मुली त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. त्या त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. हा त्याचा भ्रम इतका वाढला की, तो अगदी उघडपणे आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करू लागला. अखेर या भ्रमाचे रूपांतर मानसिक आजारात झाल्याने या तरुणाला डॉक्टरांकडे घेऊन जावे लागले. लिऊ असे या तरुणाचे नाव आहे. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या काळात त्याला हे भ्रम होण्यास सुरुवात झाली होती. त्याने वर्गातील मुलींना प्रपोज करण्यास सुरुवात केली. मात्र त्याला नकार मिळू लागला. परंतु त्या मुली लाजत असल्यामुळे आपल्याला नकार देत असल्याचे लिऊला वाटत होते. लिऊला झालेला आजार हा ‘डिल्युजनल लव्ह डिसऑर्डर’ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
कोणती लक्षणे दिसली?
– सर्व मुलींना आपण आवडत असल्याचे त्याने आपल्या मित्रांना सांगितले होते.
– त्याने अधिकाधिक मुलींकडे आपले प्रेम व्यक्त केले. त्यांनी नकार दिल्यानंतरदेखील त्या आपल्यावर प्रेम करत असल्याचे त्याला वाटत होते.
– अचानक त्याचे वर्गातील लक्ष कमी झाले होते, अभ्यासातही तो अचानक भरपूर मागे पडला.
– त्याचे रात्रीचे झोपणेही बंद झाले होते. तो रात्र-रात्र जागून सर्व मुलींचा विचार करत होता.
– त्याचा स्वतःवरील आणि इतरांवरील खर्चही मोठय़ा प्रमाणात वाढला होता.
सर्वात जास्त हँडसम मीच
कॉलेजमधील सर्व मुलींना मी आवडतो. कॉलेजमधील सगळय़ात हँडसम मुलगा मी आहे, असे लिऊने डॉक्टरांना सांगितले. डॉ. लू झेंजिआओ यांनी याबाबत माहिती दिली. त्याचा हा भ्रम जसा वाढत गेला, तसा त्याच्या वर्गमित्रांना त्याचा त्रास होऊ लागला, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केलेय. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List