अटकेनंतर केजरीवालांना CM पदावर राहण्याचा अधिकार नाही; ‘आप’च्या माजी मंत्र्याची HC मध्ये याचिका
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) 21 मार्च रोजी अटक केली. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून राउज एव्हेन्यू कोर्टाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एकीकडे केजरीवाल तिहार तुरुंगातून सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून नैतिकतेच्या आधारे केजरीवाल यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी भाजपने केली आहे. आपच्या माजी आमदारानेही आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
आपचे माजी आमदार संदीप कुमार यांनी Arvind Kejriwal यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये क्वो वारंटो याचिका दाखल केली आहे. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे संदीप कुमार यांनी म्हटले आहे. या याचिकेवर 8 एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
ईडीच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावर हटवण्यासाठी याआधीही जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. न्यायालय यात दखल देऊ शकत नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली होती.
“अटकेत असताना मुख्यमंत्रीपदावर रहायचे अथवा राजीनामा द्यायचा याचा सर्वस्वी निर्णय अरविंद केजरीवाल यांना घ्यायचा आहे. काही घटनात्मक पेच निर्माण झाला तर दिल्लीचे नायब राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्यावर निर्णय घेतील. न्यायालय या प्रकरणात कोणतेही निर्देश देऊ शकत नाही”, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
कोण आहेत संदीप कुमार?
Sandeep Kumar यांनी आपच्या तिकीटावर माजरा येथून विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रालया हे खाते देण्यात आले होते. मात्र 2016मध्ये त्यांची एक सीडी बाहेर आली होती. या सीडीमध्ये ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसले होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीला समर्थन दिल्याने विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली होती. तेव्हापासून ते आपमध्ये सक्रिय नव्हते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List