विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचे कटकारस्थान देवेंद्र फडणवीसांचेच; नाना पटोले यांचा घणाघाती आरोप
भाजपने मागील दहा वर्षांत अत्यंत खालची पातळी गाठली. खूनशी व कपटी राजकारण करून विरोधकांना संपवण्याचे काम केले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना भ्रष्ट ठरवून ब्लॅकमेल करण्याचे षड्यंत्र रचणारा दुसरे कोणी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हटले की, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करावयास लावायचे. या ब्लॅकमेलिंगला पंटाळून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी यांनीच उघड करत फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा टराटरा फाडला आहे, असे नाना पटोले म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करताच पदे
भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना सन्मानाने संवैधानिक पदे दिली. या सर्व प्रकरणाचा सूत्रधार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या सांगण्यावरूनच आपण काम केले हे किरीट सोमय्यांनी उघड केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
भाजपला मतदार घरी बसवतील
भ्रष्टाचाराविरोधातील भाजपची लढाई ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठी होती हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाऱयांना सोडणार नाही, पण त्यांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश देणार हाच त्यांचा राजकीय अजेंडा आहे हे उघड झाले आहे. आता मतदारच भाजपला घरी बसवून त्यांची जागा दाखवतील, असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List