किस्से आणि बरंच काही- आठवणींनी भरलेली ओंजळ
>> धनंजय साठे
महाराष्ट्र मंडळ, बंगळुरूने फक्त कला क्षेत्रच नाही, तर क्रीडा क्षेत्रातसुद्धा बरेच क्रीडापटू घडवले. लहान वयात मला सचिव बनण्याची संधी आणि दिलदार वृत्ती तेव्हाच्या कार्यकारिणी समितीने दाखवली होती आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. त्या प्रत्यक्ष सहभागामुळे अनेक सुंदर क्षण आणि आठवणींनी माझी ओंजळ भरलेली आहे.
मागच्या पानावरून पुढे येताना आपण पाहिलं की, महाराष्ट्र मंडळ, बंगळुरूने अनेक कलाकार, लेखक घडवले. फक्त कला क्षेत्रच नाही, तर क्रीडा क्षेत्रातसुद्धा महाराष्ट्र मंडळाने बरेच क्रीडापटू घडवले. डिसेंबरमधल्या शेवटच्या आठवडय़ाची सगळेच क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असत. मला आठवतंय की, मंडळाच्या कार्यकारिणीच्या सभेत जेव्हा पहिल्यांदा खेळांसाठी प्रस्ताव मांडला गेला तेव्हा मी स्वत महाराष्ट्र मंडळ, बंगळुरूचा सचिव होतो. तेव्हाच्या कार्यकारिणीने सभेत एकमताने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला होता आणि बाहेर कुठे नाही, तर मंडळाच्या पहिल्या मजल्यावर बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम आणि बुद्धिबळ अशा खेळांपासून सुरुवात झाली होती. सभासदांचा काय उदंड प्रतिसाद मिळाला होता त्या वेळी!
वर्षाअखेरचे ते पाच दिवस अक्षरश अविस्मरणीय असायचे. सर्व क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटांत विभागल्या जायच्या आणि एकाच वेळी आयोजितही केल्या जायच्या. म्हणजे एखाद्याची बॅडमिंटनची मॅच झाली की, तो लगेच टेबल टेनिसच्या मॅचची तयारी करायला घ्यायचा आणि त्याच दिवशी कॅरमच्या मॅचमध्येसुद्धा भाग घ्यायचा. अतिशय सोनेरी दिवस होते ते. अटीतटीचे सामने रंगायचे. खेळाच्या निमित्ताने बऱयाच नवीन लोकांशी ओळखी व्हायच्या. उच्च पदांवर कार्यरत असलेली मंडळी किंवा मोठे उद्योगपती, जे महाराष्ट्र मंडळाचे सभासद होते, सर्वसामान्यपणे ते जरा गंभीर प्रवृत्तीचे वाटायचे, पण एकेका मुद्यासाठी जेव्हा भांडायचे तेव्हा मजा वाटायची. अतिशय चुरशीची लढत असायची या सामन्यांमध्ये.
वर्षाचे पहिले तीन महिने जरा धिम्या गतीने चालायचे. कारण तो विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा मौसम असायचा, पण एकदा का परीक्षा संपल्या की, एखाद्या पर्यटनस्थळी वार्षिक सहल ठरलेली असायची. महाराष्ट्र मंडळ, बंगळुरूची अनेक सामाजिक कार्यामध्येही आगेकूच असायची. असंख्य गरजू आणि पात्र मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यापासून ते अनेक युवकांना आर्थिक सहकार्य व मार्गदर्शन करणारे ‘बडे दिलवाले’ पण याच मंडळाने दिले. असंख्य दिग्गज कलाकार मंडळींनी महाराष्ट्र मंडळाचा रंगमंच त्यांच्या कलाविष्काराने उजळून टाकलेला आहे. उदा. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दोन तासांच्या सुरेल मैफलीने श्रोत्यांचे देहभान हरपवले आहे. दिलीप प्रभावळकर, जे माझ्या वडिलांचे कॉलेजपासूनचे अतिशय जवळचे मित्र, त्यांनी ‘हसवाफसवी’चे प्रयोग करून प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. या यादीत अनेक मान्यवर आहेत. प्रशांत दामले, अमोल पालेकर, पंडित राम नगरकर… असे अनेक.
क्रीडा क्षेत्रात आमच्या कार्यकारी मंडळाने सिक्सर मारला, जेव्हा त्यांनी सुनील गावसकर, संदीप पाटील, चंद्रकांत पंडित, किरण मोरे आदी मंडळींना बोलावले होते तेव्हा. त्यावेळी हे सगळे क्रिकेटर्स लोकप्रियतेच्या शिखरावर होते. वेळ काढून त्या सगळ्या दिग्गज मंडळींनी मंडळातल्या श्रोत्यांबरोबर किश्शांनी भरलेली संध्याकाळ घालवली होती. त्या काळात मी पण क्रिकेटमध्ये करीअर बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून होतो. त्यामुळे क्रिकेटवेडय़ा धनंजय साठेंनीच प्रत्येक खेळाडूसाठी प्रश्नांची यादी काढून ठेवायची असा जणू अलिखित नियमच होता. ती संपूर्ण संध्याकाळ तसेच अनेक कार्यक्रम खास आठवणीत राहिले आहेत.
आज महाराष्ट्र मंडळाच्या अनेक शाखा देशातल्या विविध शहरांत उत्तम काम करत आहेत. खूप सुंदर कार्यक्रमांची व विचारांची देवाणघेवाण चालूच असते. हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, बेळगाव, इंदुर अशी देशभर आपली महाराष्ट्र मंडळे कार्यरत आहेत. महाराष्ट्र मंडळ, बंगळुरूच्या जडणघडणीत किर्लोस्कर समूहाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ, बंगळुरूचा मी सचिव होतो. त्या काळात मला तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. वसंत साठे यांच्याबरोबर काही मोलाचे क्षण घालवण्याची संधी महाराष्ट्र मंडळामुळे मिळाली होती.
लहान वयात मला सचिव बनण्याची संधी आणि दिलदार वृत्ती तेव्हाच्या कार्यकारिणी समितीने दाखवली होती आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. इंटरनेट नसतानासुद्धा मंडळाच्या कामकाजाचा आढावा, येऊ घातलेले कार्यक्रम व इतर माहितीसाठी मंडळाने सुरू केलेलं ‘स. न. वि. वि.’ मासिकाने माझे व माझ्या सोबत असलेल्या युवा पिढीचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात मोठा हातभार लावला. त्या मासिकाची संपादिका बराच काळ माझी आईच होती. तर अशा या आमच्या महाराष्ट्र मंडळाची माहिती आणि महती किती सांगावी! न संपणाऱया आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. 1 एप्रिल हा मंडळाचा स्थापना दिन. यंदा 104 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ही वास्तू आमच्या सारख्या अनेक पिढय़ा घडवत राहो.
(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List