सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, प्रतितोळा 71,482 रुपये भाव
देशातील सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केला. ‘जीएसटी’ सह सोन्याचा भाव आज प्रतितोळा ७१ हजार 482 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी 9 मार्च रोजी सोने 65 हजार 700 रुपये प्रतितोळा झाले होते. तर जीएसटीसह सोन्याचे दर 67 हजार 500 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोने 62 ते 63 हजारांदरम्यान होते. पण आता सोन्याने मोठी झेप घेतल्याचे बोलले जात आहे.
शहरातील सुवर्णनगरीतील सराफा बाजारात सोने आणि चांदीने कमाल दरवाढ नोंदवली. या दरवाढीमुळे सराफा बाजारात खरेदीसाठी गेलेला ग्राहक हिरमुसून बाहेर पडत आहे. काही जण तर किमती ऐकूनच खरेदीचा बेत रद्द करत आहेत. तर लग्नसराईत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नाईलाजाने मौल्यवान धातूची खरेदी करावी लागत आहे. गेल्या ९ मार्च रोजी जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर 67 हजार 500 रुपयांवर पोहोचला होता. आता त्यात चार हजार रुपयांची वाढ झाली आहे.
चांदी 80 हजार पार
येथील सराफा बाजारात चांदीच्या दरात पण मोठी वाढ झाली आहे चांदीचे दर 80 हजार 340 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. 6 मार्च रोजी 72 हजार 800 रुपये असलेल्या चांदीच्या दारातही दोनच दिवसांत 1200 रुपये वाढ झाली. चांदीचे दर 74 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. 5 ते 29 मार्चदरम्यान 24 दिवसांत सोन्याच्या दरात 6 हजारांची, तर चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ नोंदविण्यात आली आहे. लग्नसराई, लोकसभा निवडणुकीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List