Lok Sabha Election 2024 : मोदी लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत; सोनिया गांधी कडाडल्या
लोकशाही धोक्यात असून संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देशापेक्षा स्वत:ला महान समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत. विरोधकांना धमक्या देऊन भाजपसोबत येण्यास भाग पाडले जात आहे, असा घणाघात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी चढवला. राजस्थानमधील जयपूर येथे विद्याधर नगर मैदानात आयोजित प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकावर आसूड ओढले.
पारतंत्र्याच्या अंधारात अडकलेल्या या देशात एकेकाळी आपल्या महान पूर्वजांनी कठोर संघर्षाच्या बळावर स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आता इतक्या वर्षानंतर त्या ज्योतिचा प्रकाश थोडा मंदावला असून अन्यायाचा अंधार वाढत चालला आहे. याविरुद्ध लढून न्यायाची ज्योत तेवत ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा आणि अन्यायाविरुद्ध एकजूट व्हा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
त्या पुढे म्हणाल्या की, हा देश काही मोजक्या लोकांची जहागिरी नाही. देशापेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही. आज लोकशाही धोक्यात असून संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. भाजपच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महागाईने उच्चांक गाठला आहे. रोजच्या कमाईतून खाण्यापिण्याचा खर्च भागवणेही कठीण झाले असून जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमतींमुळे गृहिणींच्या अडचणी वाढल्या आहेत. परंतु आज असे नेते सत्तेवर बसले आहेत जे स्वत:ला देशापेक्षा मोठे मानतात आणि ते लोकशाहीचे वस्त्रहरण करत आहेत.
देश से ऊपर हो जाने की बात सपने में भी नहीं सोची जा सकती।
क्या कोई देश से बड़ा हो सकता है? जो ऐसा सोचता है, उसे देश की जनता सबक सिखा देती है।
दुर्भाग्य से आज हमारे देश में ऐसे नेता सत्ता में विराजमान हैं। मोदी जी खुद को महान मान कर देश और लोकतंत्र की मर्यादा का चीरहरण कर रहे… pic.twitter.com/kCPZ6wtNM1
— Congress (@INCIndia) April 6, 2024
देशातील लोकशाही धोक्यात आली असून संविधानिक संस्थांवर ताबा मिळवून त्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये बेरोजगारी, महागाई, जाती-जाती, धर्मा-धर्मातील संघर्ष आणि अत्याचाला प्रोत्साहन देण्याचे काम सरकारने केले आहे. यालाच हुकुमशाही म्हणतात आणि आपण सर्व एकजुटीने त्याचा सामना करू. गोरगरिब, देशाचे भविष्य असणाऱ्या मुलांचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही. देश जागरुक होत असून प्रत्येक देशवासियाचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असेही त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List