श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम करणार नाही, भाजप आमदाराच्या समर्थकांचा एकमुखी निर्धार
जागावाटप आणि उमेदवारीवरून वाशिम आणि हिंगोली मतदारसंघांमध्ये मिंधे गटात आधीच नाराजी आणि अस्वस्थता असताना यात आता कल्याणची भर पडली आहे. कल्याण मतदारसंघासाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. पण आता हा मतदारसंघ मिंधे गटाला दिल्याची चर्चा आहे. यावरून स्थानिक भाजप आमदार समर्थकांनी मिंधेंच्या उमेदवाराविरोधात विरोधाचे निशाण फडकावले आहे.
ठाणे आणि कल्याणवरून महायुतीत प्रचंड मतभेद निर्माण झालेले असतानाच शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले. कल्याणमधून श्रीकांत शिदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा त्यांनी केली. एकीकडे फडणवीस यांनी ही घोषणा केली असली तरी दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होत आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता त्यांचे काम करणार नाही असा ठाम निर्धार भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.
हे वाचा – ठाण्यात मिंध्यांचे सहन होईना, सांगताही येईना! शिवसेनेच्या राजन विचारे यांची प्रचारात आघाडी
भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. कल्याण लोकसभेची जागा ही भाजपलाच मिळावी अशी जोरदार मागणी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. श्रीकांत शिंदे यांना ही जागा दिली तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही असा एकमुखी ठरावही यावेळी करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List