अस्थमावर प्रभावी औषध येणार
यूकेमध्ये 5 दशलक्षहून अधिक लोकांना दमा आहे. प्रत्येक 12 प्रौढांमागे एक आणि प्रत्येकी 11 मुलांपैकी एक अस्थमा रुग्ण आहेत.
अस्थमा म्हणजेच दमा हा फुप्फुसाचा एक गंभीर आजार आहे. या आजारात श्वासनलिका आपुंचन पावते, तिला सूज येते. त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. अस्थमा आजारात फुप्फुसाचे नुकसान होते, पण हे नुकसान नेमके कशामुळे होते, याचा शोध घेण्यात यूकेच्या संशोधकांना यश आले आहे. अस्थमा अटॅकमध्ये रुग्णाच्या श्वासनलिकेतील अस्तरच्या पेशी (द सेल लायनिंग) दबल्या जातात आणि नष्ट होतात. हेच कारण आहे ज्यामुळे फुप्फुसांची हानी होते, असा महत्त्वपूर्ण शोध संशोधकांनी लावला आहे. आतापर्यंत अस्थमा संशोधनात श्वासनलिकेतील या पेशी अस्तरकडे (द सेल लायनिंग) दुर्लक्ष झाले होते. मात्र यापुढे त्यावर अधिक लक्ष देऊन अस्थमावर प्रभावी औषध शोधता येणार आहे.
किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी सायन्स जर्नलमध्ये अस्थमावरील नव्या संशोधनाची माहिती दिली. दमा रुग्णाची श्वासनलिका परागकण, पाळीव प्राणी आणि व्यायाम यांसारख्या ट्रिगर्सना संवेदनशील असते.
तपशीलवार अभ्यास
किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांनी उंदीर आणि मानवी फुप्फुसांच्या उतींवर (टिश्यू) याचा तपशीलवार अभ्यास केला. प्रमुख संशोधक प्रोफेसर जॉडी रोसेनब्लाट यांनी सांगितले की, ब्रोन्कोकॉनस्ट्रक्शनमुळे श्वासनलिकेच्या अस्तरांचे नुकसान होते. परिणामी दीर्घकाळ जळजळ, इन्फेक्शन होते. ज्यामुळे अटॅक अधिक होतात. आतापर्यंत या अस्तरांकडे दुर्लक्ष झाले होते.
यावर उपाय काय…
यूकेचे संशोधक सध्या गॅडोलिनियम नावाच्या घटकाकडे संभाव्य प्रतिबंधात्मक उपचार म्हणून बघत आहेत. सध्या किमान उंदरामध्ये तरी हा घटक परिणामकारक दिसत आहे. मात्र मानवामध्ये गॅडोलिनियम घटक किती सुरक्षित ठरेल किंवा परिणामकारक ठरेल, यावर बरेच संशोधन होणे गरजेचे आहे. त्यावर शास्त्रज्ञांना बरीच वर्षे संशोधन करावे लागणार आहे. नव्या संशोधनामुळे दमा रुग्णांवरील उपचाराचा एक नवा पर्याय खुला झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List