बारामतीबाबत फडणवीसांचे वक्तव्य हास्यास्पद, जयंत पाटील यांचा टोला
देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीबाबत केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे. ही लढाई कोणाच्या विरुद्ध आहे हे बारामतीकरांना माहिती आहे, ते याला त्याच पद्धतीने उत्तर देतील. सर्व्हेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना समोर आल्याने फडणवीस यांनी नॅरेटिव्ह बदलण्याचा छोटासा प्रयत्न केलाचा टोला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी फडणवीस यांचे हे वक्तव्य हास्यस्पद असल्याचे म्हटले.
फडणवीस यांनी भेट घेतलेले माने कुटुंबीय शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून राहिले असून त्यांना कधीही विचारले तर 200 टक्के शरद पवार यांचेच नाव घेतील. पण मत बदण्यासाठी वेगवेगळ्या दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी कोपरखळीही जयंत पाटील यांनी लगावली.
संजय मंडलिक यांचा पराभव करणे देवालाही शक्य नाही आणि गरज पडली तर हेलिकॉप्टरने मतदार आणू असे म्हणणारे अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला. हेलिकॉप्टरने मतदार आणू म्हणजे मतदारांची सगळी ‘व्यवस्था’ करायचे ठरल्याचे दिसतेय. भरपूर घबाड दिसतेय, त्यामुळेच मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी सुरू आहे. यामुळे आमचे विरोधक पैशाने किती गब्बर आहेत हे दिसतेय. समोरच्या बाजूने किती माया गोळा करण्यात आली हे देखील दिसत असून आम्ही जनतेच्या साथीने आणि जनतेच्या जिवावर निवडणुकांना सामोरे जातोय. जनता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पारड्यात वजन टाकून महाराष्ट्राला पुन्हा रुळावर आणण्याचे काम करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List