ईडी, ईओडब्ल्यूला हायकोर्टाचा दणका; पीएमसी घोटाळा प्रकरणात पिता-पुत्राला जामीन
पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय(ईडी) आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. या तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या स्वतंत्र गुह्यांत एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान व त्यांचा मुलगा सारंग वाधवान या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. वाधवान पिता-पुत्राच्या कंपन्यांवर छापेमारी सुरू ठेवली असतानाच ईडीला हा जबरदस्त झटका मिळाला.
पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेत मोठय़ा प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाल्याचा आरोप करीत ईडीने 17 ऑक्टोबर 2019 रोजी वाधवान पिता-पुत्राला अटक केली होती. तेव्हापासून मागील चार वर्षे दोघे आर्थर रोड तुरुंगात आहेत. खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नसतानाही तुरुंगात ठेवले, यावर आक्षेप घेत दोघांनी नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यांच्या जामीन अर्जांवर न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी डिसेंबरमध्ये सुनावणी सुरू केली व चार महिन्यांतच जामिनाचा निर्णय दिला. त्यामुळे ईडी आणि मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूला जबरदस्त झटका बसला आहे. सुनावणीवेळी राकेश वाधवान यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील हर्षल निंबाळकर, अॅड. सागर शेट्टी, अॅड. सत्यम निंबाळकर यांनी, तर सारंग वाधवानत अॅड. आबाद पोंडा यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.
दोन्ही गुह्यांत प्रत्येकी पाच लाखांचा जामीन
ईडी आणि ईओडब्ल्यूने स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे दोन्ही गुह्यांत प्रत्येकी पाच लाख रुपयांचा जामीन आणि वैयक्तिक जातमुचलक्यावर दोघांना तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश न्यायमूर्ती मोडक यांच्या एकलपीठाने दिले.
खटला सुरू न होताच कमाल शिक्षेचा निम्मा अवधी कोठडीत!
आर्थिक अफरातफरीच्या गुह्यात जास्तीत जास्त सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. खटल्यात दोषत्व सिद्व होते की नाही यावर या शिक्षेचे भवितव्य अवलंबून असते. मात्र खटला सुरू होण्याआधीच वाधवान पिता-पुत्राला कमाल शिक्षेच्या तुलनेत निम्मा अवधी तुरुंगात काढावा लागला. दोघे चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत याकडे सुनावणीदरम्यान अॅड. निंबाळकर आणि अॅड. पोंडा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते.
दोघांची आज सुटका?
न्यायालयाच्या निर्णयामुळे वाधवान पिता-पुत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या शर्तींचे पालन करुन हे दोघे शनिवारी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्राबाहेर न जाण्याची अट उच्च न्यायालयाने घातली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List