मालगुंड येथे कोमसापचे 6 व 7 एप्रिलला जिल्हा साहित्य संमेलन
कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा रत्नागिरीच्यावतीने तिसरे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन 6 व 7 एप्रिल रोजी कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष पद ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अनुपमा निरंजन उजगरे भुषवणार आहेत, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार दि.6 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ यावेळेत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्षा डॉ.अनुपमा उजगरे, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रा.सुरेश जोशी, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनिल मयेकर, कोमसापचे संस्थापक, अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, विश्वस्त रमेश कीर, अरुण नेरुरकर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, कार्यवाह माधव अंकलगे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी साडेबारा वाजता ‘पुस्तकं सांगतात खूप काही’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्षपद प्रा.सुरेश जोशी भुषवणार असून प्रा.बाळासाहेब लबडे, जयू भाटकर, मदन हजेरी आणि जयश्री बर्वे परिसंवादात सहभागी होणार आहेत. निवेदन पुर्वा पेठे करणार आहेत. दुपारी तीन वाजता कविता, पद्य, पदन्यास हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये अमेय धोपटकर, स्मिता बापट आणि अन्य सहकारी सहभाग घेणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता युवक आणि समाज माध्यमावरील लेखन या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये माधव अंकलगे, अरुण मोर्ये, राजेश गोसावी, शाहीद खेरटकर, युयुत्सू आर्ते सहभाग घेणार असून परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रा.गोविंद राठोडकर भुषवणार आहेत तर संवादक प्रा.हनुमंत कदम आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता नैऋत्येकडील वारा हे निमंत्रीत कवींचे संमेलन होणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, प्रवीण दवणे, रुजारिओ पिंटो, उषा परब, लता भुते, आकांक्षा भुर्के, देवीदास पाटील आणि अरुण म्हात्रे सहभागी होणार आहेत. रात्री नऊ वाजता कोकणी लोककलांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
रविवार दि.7 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता ‘बदलते कोकण हा परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये रमेश कीर, नितीन जोशी, प्रा. सुशील शिवलकर, सतीश कामत आणि प्रमोद कोनकर सहभागी होणार आहेत. सकाळी सव्वाअकरा वाजता ‘कवितेच्या गावा जावे’ ही काव्यमैफील रंगणार आहे. त्यामध्ये अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, एल.बी. पाटील, अनुपमा उजगरे, सुधीर शेठ सहभागी होणार आहेत. दुपारी एक वाजता ‘बालसाहित्याच्या प्रांगणात’ हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे शाळेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे संवादक ज्योत्स्ना सागवेकर आहेत. दुपारी तीन वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कवींचे कवीसंमेलन होणार आहे. त्यामध्ये अमेय धोपटकर, अरुण मोर्ये, उज्ज्वला बापट, शुभदा मोरे आणि जिल्ह्यातील इतर शाखांचे कवी सहभागी होतील. याचे सूत्रधार शाहीद खेरटकर आणि दुर्गेश आखाडे आहेत. संध्याकाळी साडेचार वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे. यावेळी कोमसापचे विश्वस्त रमेश कीर, मालगुंड स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List