स्नेहा ठरली कुंकूवाले समाजातील पहिली डॉक्टर!
वडिलांचा व्यवसाय स्टेशनरी विकण्याचा. मिळकत तशी जेमतेमच; पण मुलांना शिकविण्याची जिद्द खूप. पोरीला चांगल्या गुणवत्तेमुळे एमबीबीएसला प्रवेश मिळाला. पण, पुढील खर्च आवाक्याबाहेरचा होता. त्यासाठी त्यांनी राहते घर विकले, पण परिस्थितीला स्नेहाच्या डॉक्टरकीच्या शिक्षणाआड येऊ दिले नाही. राज्यात कुंकूवाले समाजातील पहिली मुलगी डॉक्टर झालेल्या स्नेहा चंदनवाले आणि तिचे वडील यल्लाप्पा यांच्या जिद्दीची ही कथा.
मिरजेत मंगळवार पेठेत विश्वश्री चौकात चंदनवाले कुटुंब भाडय़ाच्या घरात राहतात. दोन मुली, एक मुलगा असा चंदनवाले दाम्पत्याचे कुटुंब. स्नेहाने बारावीला 78 टक्के गुण मिळविल्यानंतर निट परीक्षेमध्येही बाजी मारली. चांगल्या गुणांमुळे मुंबईच्या कूपर वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय शुल्कात प्रवेश मिळाला. प्रवेशासाठी जास्त पैसे लागले नसले, तरी पुढील शिक्षण व मुंबईत राहणे हा खर्च मोठा होता. मात्र, हातावरचे पोट असलेल्या यल्लाप्पा यांनी हार मानली नाही. दैवाने लेकीच्या पदरात टाकलेले दान व्यर्थ जाऊ नये, यासाठी कंबर कसली. त्यासाठी राहते घर विकले आणि स्नेहाच्या डॉक्टरकीसाठी पैसा उभा केला. तिनेही वडिलांच्या इच्छा पूर्ण केल्या. चांगल्या गुणांसह एमबीबीएस उत्तीर्ण झाली. कुंकूवाले समाजात एमबीबीएस डॉक्टर झालेली ती पहिलीच मुलगी असल्याचा दावा यल्लाप्पा यांनी केला. आता स्नेहाला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठीही ते मागे हटणार नसल्याचे मोठय़ा जिद्दीने सांगतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List