लाडक्या ‘पांडा’ने रडवले
दक्षिण कोरियातील सर्वात लोकप्रिय पांडा आता परत चीनमध्ये जाणार आहे. तिचे नाव ‘फू बाऊ’ असे आहे. फू बाऊ म्हणजे लहानथोरांचा दोस्त…एवरलँड थीम पार्कचे प्रमुख आकर्षण. मात्र यापुढे फू बाऊ पांडा दक्षिण कोरियात राहणार नाही. तिची एक झलक दिसणार नाही. यामुळे तिचे चाहते दुःखी झाले आहेत. बुधवारी पांडाला निरोप देण्यासाठी दक्षिण कोरियाच्या रस्त्यांवर लोक मोठय़ा संख्येने जमले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी पाऊसही सुरू झाला. जणू काही पांडाला निरोप द्यायला पावसानेही हजेरी लावली.
2016 साली ‘फू बाऊ’च्या जन्मदात्यांना चीन
येथून दक्षिण कोरियात आणण्यात आले होते. चीनच्या एका योजनेनुसार प्राण्यांना दक्षिण कोरियात पाठवण्यात येते. मात्र त्यांच्यावर चीनचा मालकी हक्क कायम राहतो. ‘फू बाऊ’ पांडाचा 2020 साली जन्म झाला होता. तेव्हापासून ही पांडा दक्षिण कोरियात खूप लोकप्रिय आहे. निरोप समारंभाच्या दिवशी ‘फू बाऊ’ची स्वारी मोठय़ा ट्रकमधून निघाली. ट्रकवर फू बाऊचा मोठा पह्टो लावला होता. ‘आम्ही तुला भेटू शकलो, हा सर्वात मोठा चमत्कार होता. थॅक्स यु फू बाऊ’ असा संदेश ट्रकवर लिहिला होता. भर पावसात लोक पह्टो काढत होते. अश्रू पुसताना दिसत होते. निरोप देताना प्राणीसंग्रहालयाचे मॅनेजर कांग चिओल म्हणाले, ‘10 वर्षे होऊ दे किंवा 100 वर्षे, फू बाऊ आमच्यासाठी नेहमी बेबी पांडाच राहील. ‘फू बाऊ’ला आम्ही कधी विसरणार नाही. ’
प्राणी नव्हे मित्र… आनंदाचा खजिना
कोरियन भाषेत फू बाऊ चा अर्थ नशीबवान खजिना असा होता. फू बाऊ पांडा म्हणजे अनेकांना गवसलेला आनंदाचा खजिनाच जणू. प्राणी नव्हे मित्र होता. निरोपाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले 31 वर्षीय किम जिन म्हणाले, मी तीन वर्षांपूर्वी मानसिक आजाराने त्रस्त होतो. मात्र फू बाऊ ची भेट झाली आणि माझा सारा आजार पळून गेला. याक्षणी पांडाला अलविदा करणे कठीण जातंय. मात्र तिला जावं लागेल. ती सुरक्षितपणे चीनमध्ये जाईल आणि आनंदात राहील, अशी मी आशा करतो.पांडाचे चाहते दूरदूरून एवरलँड थीम पार्कच्या बाहेर जमा झाले होते. 24 वर्षीय आह ह्योन म्हणाले, ही आमची शेवटची संधी आहे. फू बाऊला पुन्हा कधी भेटू आम्हाला ठाऊक नाही.
जायंट पांडा… डेंजर झोनमध्ये
जायंट पांडा म्हणजे मध्य चीनच्या पर्वतांमध्ये बांबूंच्या जंगलात वास्तव्य करणारे काळ्या पांढऱया रंगाचे अस्वल. पांढऱया चेहऱयावर आणि मानेवर गोल काळे कान आणि डोळ्यांवर काळे ठिपके दिसतात. जगभरात या प्रजातींची संख्या कमी आहे. त्यामुळे जायंट पांडा धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत आहे. नर जायंट पांडा सहा फूटापर्यंत उंच आणि 100 किलो वजनाचे असतात. मादी पांडाची उंची त्यातुलनेने लहान असते. मादी पांडा वर्षातून केवळ एकदा ठराविक काळात गर्भधारणा करू शकते. तिची पिल्लं वजनाने लहान असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List