द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात; खरड छाटणीला पाणीटंचाईचा फटका
जिह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बळीराजाला आता खरड छाटणीचे वेध लागले आहेत. परंतु, त्यालाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. छाटणीच्या वेळी द्राक्ष बागेला पाण्याची मोठी आवश्यकता असते. आताच पाण्याची ही अवस्था तर अद्यापही अजून अडीच महिने प्रखर उन्हाळा बाकी आहे. छाटणी घेण्यासाठीही बळीराजाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सांगली जिह्यातील एकटय़ा कवठे महांकाळ तालुक्यात 3283.86 हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. तर, घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात 445.10 हेक्टर इतके द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे. चालूवर्षी व्यापारी व दलाल यांच्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱयांची होणारी आर्थिक फसवणूक, मिळणारा कमी दर यामुळे बऱयाच शेतकऱयांनी बेदाणानिर्मितीला मोठी पसंती दिली आहे.
सांगली जिह्यातील द्राक्ष हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा आर्थिक जमाखर्चाचा ताळमेळ कसाबसा घालून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच त्याला आता खरड छाटणीच्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. छाटणीसाठी आता त्याला एकरी 25 हजार रुपये मोजावे लागत आहेत. छाटणीसाठी मजूर झाडागणीक चार रुपये मागत आहेत. त्यामुळे बळीराजाला द्राक्षशेती करणेही मुश्कील झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
छाटणीसाठीचा येणारा खर्च
छाटणीस पाच हजार रुपये, पेस्ट लावणे तीन हजार रुपये, काडी निरळणे चार हजार रुपये, पहिले सबकेन अडीच हजार रुपये, शेंडा मारणे दोन हजार रुपये, पहिला खुडा तीन हजार, दुसरा खुडा तीन हजार रुपये, तिसरा खुडा अडीच हजार रुपये असा 24 हजार 500 रुपये एक एकर बाग छाटणीसाठी खर्च येत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List