Heatwave Maharashtra : राज्यात 28 दिवसांत 23 जणांचा उष्माघाताने मृत्यू
राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, अनेक ठिकाणी पारा चाळीशीवर गेला आहे. एप्रिलमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात आणखी तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताची 23 प्रकरणे आढळून आली आहेत.
मार्चपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लोकांना उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या 28 दिवसांत 23 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याने ही संख्या चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यापैकी दहा मृत्यू 10 दिवसांत नोंदवले गेले आहेत.
अमरावती जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत तीन मृत्यू नोंदविले गेले आहेत. रायगड, पुणे, बीड, बुलढाणा आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन मृत्यू नोंदवले गेले आहेत. तर ठाणे, नगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड आणि सातारा येथे प्रत्येकी एक मृत्यू नोंदविण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील तापमान 39 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस उष्माघाताची लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संभाजीनगरमधील आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयांमध्ये चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, डोकेदुखी असे एकूण 100 रुग्ण दाखल झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List