prithvi shaw : पृथ्वी शॉ अडचणीत, न्यायालयाचे दिले चौकशीचे आदेश
आयपीएलचा हंगाम सुरु असताना क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2023 मध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सपना गिल हिने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी विनयभंग व मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी पृथ्वी शॉने हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. शिवाय पोलिसांनाही तपासात काही पुरावे मिळाले नव्हते. पोलिसांनी तक्रार दाखल न करून घेतल्याने सपना गीलने दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. शिवाय मुंबई पोलिसांविरोधातही कारवाईची मागणी तिने केली आहे. या प्रकरणाची दखल घेत बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
ही घटना फेब्रुवारी 2023 ची आहे. सोशल मीडिया इ्फ्ल्यूएन्सर सपना गिल हिने अंधेरीच्या एका पबमध्ये पृथ्वी शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि अन्य लोकांवर विनयभंग व मारहाणीचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशीही केली. पोलीसांच्या माहितीनुसार, पबमध्ये उपस्थित लोकांकडून कळले की, कोणीही सपला गिल हिच्याशी छेडछाड केली नव्हती. पोलिसांनी एअर ट्राफीक कंट्रोलच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला त्यावेळी कळले की, सपना गील हातात बेसबॉलची बॅट घेऊन पृथ्वी शॉच्या कारच्या मागे धावत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेल येथे असताना आरोपी सना उर्फ सपना गिल आणि शोबित ठाकूर यांनी त्याच्याकडे सेल्फीसाठी हट्ट केला. दोघांनी सेल्फीही घेतला, मात्र पुन्हा एकदा सेल्फी घेण्यासाठी पृथ्वीला सोबत येण्यास सांगितले. परंतु पृथ्वीने नकार दिला आणि मित्रांसोबत जेवणासाठी निघून गेला. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने दोघांनाही बाहेर काढले. त्यामुळे दोन्ही आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी काही वेळानंतर हॉटेलबाहेर पडलेल्या पृथ्वीच्या कारचा पाठलाग सुरू केला.पृथ्वी शॉ याची कार जोगेश्वरी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ आलेली असताना आरोपींनी समोरून कार अडवली. त्यानंतर बेसबॉलच्या बॅटने कारच्या काचा फोडल्या. सुदैवाने या कारमध्ये पृथ्वी शॉ नाही तर त्याचा मित्र आशिष यादव, कारचालक आणि अन्य एक व्यक्ती होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या चौघांना अटक केली होती. पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते की, सपना गिल हिने पृथ्वी शॉच्या गाडीचा आरसा फोडला होता. पोलिसांनी एक अहवाल सादर करुन सपनाने केलेले आरोप हे खोटे असल्याचे म्हटले होते. मीडिया वृत्तानुसार, हा वाद सेल्फीवरुन झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणात 2023 मध्ये सपना गिलसोबत अनेकांना पृथ्वी शॉ वर हल्ल्याप्रकरणी अटक केली होती. जामिन मिळाल्यानंतर सपना गीलने न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आता महानगर दंडाधिकाऱ्यांनी एस.सी.तायडे यांनी या प्रकरणाचा तपास अहवाल 19 जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. दंडाधिकारी तायडे यांनी बुधवारीच हे आदेश दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List