तुमच्या सर्वोच्च नेत्याला इंग्रजीवरून प्रश्न करू नका, नाहीतर बारा वाजतील
मी इंग्रजीतून भाषण केले, ते महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी इंग्रजीतून वाचून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे वक्तव्य भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी केले. विखेंच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार समाचार घेतला आहे. तुमच्या सर्वोच्च नेत्याला इंग्रजीबाबत हा प्रश्न विचारू नका, नाहीतर तुमचे बारा वाजतील, असे पवार यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता विखेंना फटकारले आहे.
आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर सुजय विखे यांचा व्हिडीओ पोस्ट करत त्यावर एक पोस्ट लिहिली आहे. लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही, हे महत्त्वाचे नसते, तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱया भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱया मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. भाषा किंवा शिक्षण यावरून कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो. पण याच आविर्भावात तुमच्या सर्वोच्च नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील!’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List