मिंधेंवर नामुष्की हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली; भावना गवळी यांचाही पत्ता कट होणार
हिंगोलीत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे. भाजपच्या प्रचंड दबावामुळे हेमंत पाटील यांना बदलून त्यांच्या जागी बाबुराव कदम हिरोळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने मिंधे गटाला दिलेला हा मोठा धक्का आहे. त्याचबरोबर यवतमाळ-वाशीममधील मिंधे गटाच्या भावना गवळी यांचाही पत्ता कट होणार आहे. त्यामुळे मिंधे गटात मोठी अस्वस्थता आहे.
हिंगोलीत शिंदे गटाने हेमंत पाटील यांचे लोकसभेचे उमेदवार म्हणून नाव जाहीर केले होते. पण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खास करून आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे अस्वस्थ झालेले हेमंत पाटील यांनी उमेदवारी वाचवण्यासाठी मंगळवारी वर्षा बंगल्यावर धाव घेतली होती. पण भाजपच्या रेटयापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही करून शकले नाहीत. अखेर हेमंत पाटील यांचे नाव बदलून शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम हिरोळीकर यांना उमेदवारी जाहीर करावी लागली आहे. बाबुराम कदम यांनी यापूर्वी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. पण दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
लोकसभेची उमेदवारी जाहीर होऊनही तिकीट कापल्यामुळे हेमंत पाटील अस्वस्थ झाले आहेत. पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिमधून उमेदवारी यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊन विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार आहे. काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन केले होते. पण भाजपने भावना गवळी यांच्या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे भाजपच्या रेटय़ामुळे शिंदे गटावर भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारावी लागली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ यांच्यात उमेदवारीवरून जोरदार संघर्ष सुरू आहे. पण भाजपच्या दबावामुळे नाशिकमधील जागेवरूनही शिंदे यांना माघार घेऊन भुजबळ यांच्या उमेदवारीला मान्यता द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List