कोपरगाव तहसील कार्यालयात 6 लाखाचा अपहार ! शहर पोलिसात गुन्हा दाखल
कोपरगाव तालुक्यातील पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत देय असलेल्या मानधन रक्कम कोपरगाव तहसील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या संगनमताने तब्बल सहा लाख रुपयांचा भष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीद्वारे हा घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी 25/02/2023 निवडणूक कार्यक्रम (12)(2) 188/2023 च्या अनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुक्यातील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) 25 पर्यवेक्षक यांच्या दोन वर्षाच्या मानधनासाठी 24 हजार रुपये प्रत्येकी प्रमाणे एकूण 6 लाख रुपये निधी कोपरगाव तहसीदार यांच्या नावे प्राप्त झाला होता. 26 /06/ 2023 रोजी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आर टी जी एस द्वारे वरील लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवलाही. मात्र येथूनच खऱ्या गोंधळाला सुरवात होते. वरील उल्लेख केलेले सर्व BLO यांची यादी तहसील कार्यलयातील राहुल साहेबराव शिरसाठ या तत्कालीन महसूल अधिकारी आणि निवडणूक संकलक या अधिकाऱ्याने तयार केलेली होती. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील बरेच BLO लाभार्थी हे एकाच कुटुंबातील आहेत . तर एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर 2-3 वेळा 24 हजार रुपयांच्या रकमा जमा झालेल्या आहेत. काही BLO लाभार्थी गृहिणी आहेत. तर एक BLO लाभार्थी चक्क महिला पोलीस कर्मचारी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी दोनदा मोबदला कधीपासून मिळायला सुरवात झाली आहे हे आता ती लाभार्थी महिला पोलीस कर्मचारी किंवा वरील भ्रष्टाचारीच सांगू शकतील .
वरील भ्रष्टाचाराचा संशय सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना आल्यानंतर त्यांनी याबाबत 5 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती . त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डी उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी 02 फेब्रुवारी रोजी चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून आज अखेर त्यावर वरील कोणत्याही विभाकडून काहीही कारवाई करण्यात आली नाही .वरील अहवालात राहुल साहेबराव शिरसाट या महसूल कर्मचाऱ्यावर निलंबनाची शिफारीस केलेली आहे. तर तहसीलदार संदीपकुमार भोसले आणि नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम 1979 चे नियम 3 मधील तरतुदीचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) 1979 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याची शिफारस शिर्डी उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अहवालात केली आहे. वरील प्रमाणे एकाच प्रकारचे काही नावे, तीच तीच नावे 2-3 वेळा यादीमध्ये येतात तरीही तहसीलदार कोणताही आक्षेप न घेता त्यांची बिले डोळे झाकून मंजूर करतात . यातच बरेच काही हितसंबंध सामावलेले दिसून येत आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये नायब तहसीलदार विलास भांबरे यांच्या फिर्यादीवरून भा.द .वी 409,420,468,471 प्रमाणे राहुल साहेबराव शिरसाठ, महसूल सहायक कोपरगाव जिल्हा अ. नगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा घडल्याचा कालावधी 21 जून 2023 ते 26 जून 2023 असा नमूद करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. मयूर भामरे हे करीत आहे. याप्रकरणातील आरोपीने प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच अपहार केलेली 6 लाख रुपयांची रक्कम कोषागारात परत जमा केली आहे. तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील इतर आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही . इतर प्रकरणात तत्परतेने कारवाई होत असते. मात्र यातील इतर आरोपी शासकीय नोकर असल्या कारणाने त्यांना कारवाई पासून सवलत मिळाली की काय असा सवाल सर्व सामान्यांना पडला आहे.
लाभार्थ्यांची नावे 1) एकनाथ नानासाहेब नजन, राहाता – रु. 24000/- 2)भास्कर पुंजाजी नजन, राहाता रु. 24000/- 3) रवींद्र पुंजा नजन, राहाता, रु. 24000/- 4)सोनाली रवींद्र नजन , साकुरी रु. 24000/- ,5)अर्चना मिनिनाथ पठारे, कोल्हार रु. 24000/-, 6) मिनिनाथ बाबासाहेब पठारे कोल्हार रु. 24000/- , 7)अर्चना मिनिनाथ पठारे, कोल्हार रु. 24000/-, 8)सागर सतीश राठोड,साकुरी रु. 24000/-, 9) चंद्रकला साहेबराव शिरसाठ राहाता – रु. 24000/- ,10) साहेबराव कोंडाजी क्षीरसागर, राहाता – रु. 24000/-,11)प्रीती बाळकृष्ण बनकर-राहाता – रु. 24000/-, 12)भास्कर पुंजा नजन – शिर्डी 24000/-,13) प्रतीक्षा शंकर गोर्डे- साकुरी ,24000/-, 14)रमेश राजाराम राजपूत – राहाता – रु. 24000/-,15) रमेश बबनराव गायकवाड- राहाता – रु. 24000/-,16) श्रीकांत पुंडलिक राठोड- राहाता – रु. 24000/-,17)अशोक लहानू भालेराव- प्रवरानगर, रु. 24000/-, 18)अशोक लहानू भालेराव- प्रवरानगर, रु. 24000/-, 19) सलीम नाझिम- साकुरी रु. 24000/-, 20)लक्ष्मण सहदेव भालेराव – बाभळेश्वर रु. 24000/-, 21) मनीषा शांताराम कुळधरण- कोपरगाव रु. 24000/-, 22)मनीषा शांताराम कुळधरण- कोपरगाव रु. 24000/-, 23)भास्कर पुंजा नजन – राहाता – रु. 24000/-, 24) सुनिता संजय जेजुरकर- राहाता – रु. 24000/-,
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List