आयआयटीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळेनात, 36 टक्के विद्यार्थी अद्यापही बेरोजगार
जानेवारी महिन्यात आलेल्या एका बातमीने चांगलंच लक्ष वेधलं होतं. आयआयटी मुंबईच्या 85 विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी रुपये इतकी नोकरी मिळाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पण आता त्या संदर्भातील अजून एका बातमीने लक्ष वेधलं आहे. आयआयटी मुंबईतील 36 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही.
एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सध्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात देश-विदेशातल्या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी 36 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. नोंदणीकृत विद्यार्थ्यांची 2000 असून त्यापैकी 712 विद्यार्थी अद्याप नोकरीपासून वंचित आहेत. ग्लोबल आयआयटी अल्मनाय सपोर्ट ग्रुप या आयआयटी क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने ही माहिती दिली आहे.
आयआयटीमध्ये सुरू असलेल्या या प्लेसमेंटची प्रक्रिया मे महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेत संगणक विज्ञान आणि अभियंता या दोन्ही शाखांना सर्वाधिक मागणी आहे. दरवर्षी या दोन्ही शाखांतील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात. पण, यंदा प्रथमच या दोन शाखांमधील विद्यार्थ्यांना अद्याप नोकऱ्या मिळालेल्या नाहीत.
गेल्या वर्षी आयआयटी मुंबईच्या 32.8 टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या. यात आता आणखी भर पडली आहे. आयआयटीच्या प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक पातळीवर आलेल्या मंदीमुळे प्लेसमेंट प्रक्रियेसाठी कंपन्यांना कॅम्पसमध्ये बोलवण्यात अडचणी येत आहेत. दरवर्षी या दरम्यान जितक्या संख्येत कंपन्या येतात, त्या तुलनेने यंदा संख्या कमी दिसत आहे, असंही ते म्हणाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List