गद्दारांच्या नुसत्याच गप्पा.. मावळमध्ये हरणार अप्पा, विकासाच्या नावाने दहा वर्षे बारणेंची बोंब
दहा वर्षे मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांची विकासाच्या नावाने बोंबच असून बेरोजगार तसेच प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत. कर्जत, खालापूरसह पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात बारणे यांच्याविषयी प्रचंड नाराजी असून भाजप कार्यकर्तेदेखील त्यांच्या विजयाची खात्री देत नाहीत. त्यामुळे गद्दार गटाचे पदाधिकारी कितीही गप्पा मारत असले तरी मावळमध्ये अप्पा हरतील अशीच चर्चा सुरू आहे.
श्रीरंग बारणे यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. गेल्या दहा वर्षांत अप्पा बारणेंनी उरणमध्ये येऊन विकासाच्या फक्त गप्पा मारल्या. मात्र उरणच्या जनतेचा एकही प्रश्न दिल्ली दरबारी तडीस लावला नाही. उरण, केगाव विभागातील जनतेचा सेफ्टी झोनचा प्रश्न अजूनही भिजत पडला असल्याने शेकडो वर्षांपूर्वीची गावे अनधिकृत ठरण्याचा धोका असल्याने जनतेत बारणे यांच्याविरुद्ध मोठी नाराजी आहे. उरण मतदारसंघात असणाऱ्या रसायनी विभागातील अनेक कंपन्यांना टाळे लागल्याने अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. हे बेरोजगार कामगार यावेळी अप्पा बारणेंना घरी बसविण्याच्या तयारीत आहेत.
बारणेंची पालखी आम्हीच का वाहायची?
उरण तालुक्यात शिंदे गटाकडे कार्यकर्तेच नसल्याने अप्पा बारणेंची पालखी आम्हीच का वाहायची, असा सवाल भाजप कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. त्यामुळे मिंधे गटाचे पदाधिकारी बेडक्या फुगवून विजयाच्या गप्पा मारत असले तरी यावेळी बारणे यांना झटका बसण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List