ऊसतोड मजुरांच्या ट्रक्टरला ट्रकची धडक; चार ठार

ऊसतोड मजुरांच्या ट्रक्टरला ट्रकची धडक; चार ठार

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सांगली जिह्यातील कवठेमंहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे मध्यरात्री दोन वाजता ऊसतोड मजुरांच्या ट्रक्टरला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर आठजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांतील तिघे मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगीचे, तर एकजण शिरनांदगीचा आहे. शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30, रा. शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (वय 35), दादा अप्पा ऐवळे (वय 17), नीलाबाई परशुराम ऐवळे (वय 3 वर्षे, रा. चिक्कलगी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे तेथील नागरिकांना रोजगारासाठी ऊसतोडणीचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी त्यांना सांगली, सातारा, कोल्हापूर येथे जावे लागते. मंगळवेढय़ातील चिक्कलगी येथील मजूर ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ येथे गेले होते. गळीत हंगाम संपल्याने सोमवारी ते गावाकडे परतत असताना मध्यरात्री दोन वाजता कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे बिघाड झाल्याने ट्रक्टर रस्त्याकडेला उभा केला होता. यावेळी भरधाव ट्रकने ट्रक्टरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चारजण ठार झाले, तर आठजण गंभीर जखमी झाले.

अपघातात मृत्यू झालेले आणि जखमी झालेले ऊसतोड मजूर गरीब असल्याने त्यांना शासकीय मदत मिळावी आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत, अशी मागणी तुकाराम महाराज यांनी केली. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश शिंदे उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज सिव्हिलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

चिक्कलगी व शिरनांदगीत शोककळा
अपघाताचे वृत्त समजताच चिक्कलगी व शिरनांदगी या गावांवर शोककळा पसरली होती. मृत मजूर व त्यांचे नातेवाईक हे परिस्थितीने गरीब असल्यामुळे पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील व गुलाब थोरबोले यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेत त्यांच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;