मराठा आंदोलकांनी अमिता चव्हाण यांचीही गाडी अडवली; ‘एक मराठा, लाख मराठा’ च्या घोषणाबाजीत परत पाठवले
नुकतेच भाजपमध्ये आलेले खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाणांना कोंढाच्या ग्रामस्थांनी वेशीवरूनच परत पाठवले होते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे मराठा आंदोलकांनी गावात प्रवेश करू दिला नाही. आंदोलकांचा रोष पाहून त्यांनाही आल्या पावली परत जावे लागले.
भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे काल सकाळी त्यांच्याच मतदारसंघातील कोंढा येथे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गेले होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांना गावात येण्यास मज्जाव केला. आंदोलकांचे उग्र रूप पाहून पोलिसांनी अशोक चव्हाणांना बंदोबस्तात गावाबाहेर काढून दिले. सोमवारी रात्रीच अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही मराठा आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागला.
अमिता चव्हाण या प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे गेल्या होत्या. मात्र त्यांची गाडी गावात शिरताच मराठा आंदोलकांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांचा रोष पाहून अमिता चव्हाण यांना आल्यापावली परतावे लागले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List