मी त्याला फोन केला पण..; अनिल कपूरसोबतच्या नाराजीबाबत काय म्हणाले बोनी कपूर?
‘नो एण्ट्री 2’ या चित्रपटात भूमिका न दिल्याने अभिनेते अनिल कपूर हे भाऊ बोनी कपूर यांच्यावर नाराज आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत निर्माते बोनी कपूर यांनी याविषयीचा खुलासा केला होता. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नो एण्ट्री’ या चित्रपटाचा सीक्वेल असून त्यात नव्या कलाकारांची वर्णी लागली आहे. पहिल्या भागात सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र आता सीक्वेलसाठी वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ यांची निवड करण्यात आली आहे. सीक्वेलमध्ये आपली भूमिकाच नाही, हे बाहेरून समजल्यानंतर अनिल कपूर हे भाऊ बोनी कपूर यांच्यावर नाराज झाले. तेव्हापासून माझा भाऊ माझ्याशी बोलत नसल्याचं बोनी कपूर यांनी सांगितलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते भावासोबतच्या वादावर व्यक्त झाले आहेत.
पाण्यापेक्षा रक्त घट्ट- बोनी कपूर
“आम्ही भावंडं आहोत आणि आमचं एकमेकांवर फार प्रेम आहे. याआधीच्या मुलाखतीत मला विचारलं गेलं की अनिल कपूर यांची प्रतिक्रिया काय होती? तेव्हा मला प्रामाणिकपणे त्यांना सांगावं लागलं की अनिल माझ्याशी बोलत नाहीये. पण मला हेसुद्धा माहित आहे की रक्त हे पाण्यापेक्षा जास्त घट्ट असतं आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळचे आहोत. त्याला दुखावण्याच्या हेतूने मी काही करू शकत नाही. पण हा कामाचा विषय आहे आणि त्यामुळे मला दिग्दर्शकांचं म्हणणं ऐकावंच लागेल”, असं बोनी कपूर म्हणाले.
बोनी कपूर यांनी अनिल कपूर यांना अनेक फोन केले पण..
अनिल कपूर यांच्यासोबतचं नातं पुन्हा पूर्ववत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याविषयी ते पुढे म्हणाले, “भूमिका आणि कथा योग्य असल्यास मी यापुढेही चित्रपट बनवत जाईन. त्याच्यासाठी एखादी भूमिका योग्य असेल तर तोच माझी पहिली पसंत असेल. आमच्यातील नातं पूर्ववत होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. नाराजीपेक्षा माझ्यासाठी हे नातं फार महत्त्वाचं आहे. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे. पण ठीक आहे. मी त्याला थोडा आणखी वेळ देईन.”
तो बोलावं यासाठी प्रयत्न करत राहीन- बोनी कपूर
“तुम्ही ज्या लोकांवर सर्वाधिक प्रेम करता, त्यांच्यासोबत असे वादविवाद होतच असतात. पती-पत्नीमध्ये भांडणं होतात, मित्रमैत्रिणींमध्ये मतभेद निर्माण होतात, भावंडांमध्येही वाद निर्माण होतात. आमच्यात भांडण झालेलं नाही, फक्त एक समस्या निर्माण झाली आहे आणि त्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी तो खूप प्रिय आहे. तो पुन्हा माझ्यासोबत बोलावं यासाठी मी प्रयत्न करत राहीन”, अशा शब्दांत बोनी कपूर यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
‘नो एण्ट्री 2’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
‘नो एण्ट्री 2’चे दिग्दर्शक अनीस बाझमी यांनाही अनिल कपूर-बोनी कपूर यांच्यातील वादाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी हे आताच ऐकतोय. थोडीफार नाराजी असेल. भुलभुलैय्या 3 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने मी बोनी कपूर यांच्याशी याबद्दल बोलू शकलो नाही. पण नो एण्ट्री हा खूप महत्त्वाचा चित्रपट होता. जर त्या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये अनिल कपूर नाहीत, तर त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. पण त्यांना न घेण्यामागे बोनी कपूर यांचीही काही कारणं असतील. पण ते भावंडं आहेत, त्यामुळे उद्या ते भेटून एकमेकांना मिठीसुद्धा मारतील. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List