पेट्रोल-डिझेलची वाहने हद्दपार करणार
देशाला हरित अर्थव्यवस्था बनवण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना असून त्याअंतर्गत पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने कायमची हद्दपार करण्याचा आमचा निर्धार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. देशाला पेट्रोल-डिझेलच्या गाडय़ांपासून पूर्णपणे मुक्त करणे शक्य आहे का, असा प्रश्न नुकत्याच एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर शंभर टक्के हे शक्य आहे, असे उत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. 2004 पासून पर्यायी इंधनासाठी मी प्रयत्नशील आहे. येत्या पाच ते सात वर्षात गोष्टी बदलतील. हे अवघड असले तरी अशक्य अजिबात नाही. हे माझे व्हिजन आहे, असेही ते म्हणाले.
इंधनाची आयात थांबवू शकतो
हिंदुस्थान इंधनाच्या आयातीवर 16 लाख कोटी रुपये खर्च करतो. हाच पैसा शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हायब्रीड वाहनांवरील जीएसटी पाच टक्के फ्लेक्स इंजिनसाठी 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. जैवइंधनाच्या वापराला चालना देऊन देश इंधनाची आयात थांबवू शकतो, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱया 36 कोटींहून अधिक वाहनांपासून देशाची सुटका करण्यासाठी हायब्रीड वाहनांना चालना देणे गरजेचे आहे. हरित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हायब्रीड वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न आहे, असेही गडकरी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List