जूनपर्यंत उकाडा जाणवेल, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा
एप्रिलचा महिना सुरु झाल्याने सूर्याने आग ओकायला सुरु केले आहे. घामाच्या धारा आणि उष्णतेने अंगाची कायली होत असताना आता हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसंदर्भात इशारा दिला आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर कर्नाटक, ओडीशा, पश्चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशला या राज्यांना जाणवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एप्रिलपासून जूनपर्यंत लोकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने म्हंटले आहे की, एप्रिल ते जून दरम्यान भयंकर उकाडा जाणवणार आहे. त्याचा सर्वात वाईट परिणाम मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय भागांवर दिसून येईल. भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, एप्रिल-जून या कालावधीत देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव मध्य आणि पश्चिम द्वीपकल्पीय हिंदुस्थानात सर्वाधिक दिसून येईल. पुढे म्हणाले की, पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यांत मैदानी भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातील विविध भागात नेहमीच्या चार ते आठ दिवसांच्या तुलनेत दहा ते वीस दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
महापात्रा म्हणाले की, गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List