एसीने घेतला जीव, एकाच कुटुंबातील चार जणांचा झाला मृत्यू
रात्रभर एसी सुरु ठेवून झोपत असाल. तर सावधान. ही तुमच्यासाठी बातमी आहे. गुजरातच्या देवभूमी द्वारका शहरात एका घरात एसी ओव्हरहीट झाल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गुदमरुन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाने बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
पोलिसांनी रविवारी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यामध्ये एका घराला आग लागून एका मुलीसह चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. पवन उपाध्याय (39), पत्नी (29), मुलगी (8 महिने) ध्याना आणि आई भवानी (69) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.पोलिसांची या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
पोलीस अधिकारी टी.सी. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका शहरात आदित्य रोडवर असलेल्या एका घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीला रविवारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. त्यावेळी घरातील पाच जणं झोपली होती. आग लागल्याने घरातील लाईट गेली आणि अंधारामुळे त्यांना घरातील दरवाजा दिसेनासा झाला. त्यामुळे ते लगेच बाहेर पडू शकले नाहीत आणि आतच गुदमरले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांना घरात एक पुरुष, पत्नी, आई आणि त्यांची 8 महिन्याची मुलगी बेशुद्धआवस्थेत सापडली. त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसी अतिगरम झाल्याने स्फोट होऊन आग लागली. फॉरेन्सिक पथक आग लागण्यामगचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List