मी पुन्हा येतोय, कोर्टात भेटू! बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयानंतर असीम सरोदे यांची प्रतिक्रिया
>> विशाल अहिरराव
मानवधिकार कार्यकर्ते मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड.असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने निलंबीत केली होती. मात्र, आता सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार काउन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. बार काउन्सिलचा निर्णय आल्यानंतर असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पुन्हा येतोय, कोर्टात भेटू! अशा शब्दांत पोस्ट करत असीम सरोदे यांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानले आहेत.
अॅड. असीम सरोदे यांनी न्यायव्यवस्था, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने त्यांनी सनद तीन महिन्यांसाठी निलंबित केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये शिवसेनेने वरळीत ‘जनता न्यायालय’ भरवले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल अॅड. सरोदे यांनी सोप्या शब्दांत मांडला. तथापि, त्यांच्या विधानातून न्यायव्यवस्था, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अपमान झाला, अशी तक्रार भाजप कार्यकर्ता राजेश दाभोळकर यांनी केली होती.
मी उद्यापासून पुन्हा कामावर रूजू होणार
संपूर्ण प्रकरणावर असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी माझ्या विरोधात दिलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा होता. मात्र, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना निर्णय देण्याचा अधिकार असल्यामुळे मी तो नम्रपणे स्वीकारला. आणि माझी बाजू बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये मांडण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण खरोखरच व्यावसायिक गैरवर्तणुकीचं आहे का? या बाबत सखोल तपासणी करूनच निर्णय द्यायला हवा, असे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आदेशात सांगण्यात आले. आणि त्यांनी माझी सनद रद्द करण्याचा करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. या बद्दल मी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे आभार मानतो. उद्यापासून मी पुन्हा कामावर रूजू होणार असून केसेस हाताळायला सुरुवात करणार आहे. व्यावसायिक गैरवर्तणुकीचा माझ्यावरील आरोप हा बिनबुडाचा आहे. हे सिद्ध करण्यासाठीची माझी लढाई सुरू राहणार आहे. मात्र, या पूर्वी कधीही व्यावसायिक गैरवर्तणूक केलेली नाही. आणि कधी करणार देखील नाही, अशा शब्दांत असीम सरोदे यांनी सामना ऑनलाइनकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List