दापोलीत धनशक्तीचा जनशक्ती पराभव करणार; भास्कर जाधव यांचा विश्वास
आपण गेली ४३ वर्षं झाली राजकारणात आहोत. अगदी ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती , जिल्हा परिषद , विधानसभा, विधान परिषद , लोकसभा , राज्यसभा, सहकार आदी क्षेत्रातील दिडशेच्या वर निवडणुकांना आपण सामोरे गेलो आहोत. आपण आपल्या सहकाऱ्यांनाही निवडून आणले. माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर एक सुध्दा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आपल्याला निवडणुकीत कधीच पैशाचा वाटप करावा लागत नाही कारण मी कार्यकर्ता जोडणारा शिवसैनिक आहे शिवसेनाचा नेता आहे. ही आपल्या समोर बसलेली जनशक्ती धनशक्तीचा निश्चितपणे पराभव करणार, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी दापोलीत व्यक्त केला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी भास्कर जाधव हे दापोली दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत दापोली शहरातील पेन्शनर्स असोसिएशनच्या सभागृहात दापोली तालुका शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. यावेळी यांनी दापोली जिल्हा परिषद ६ गटांचा तसेच १२ पंचायत समिती गणातील एकुणच संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या गट आणि गटातील प्रत्येक इच्छकांशी संवाद साधला. गट आणि गणात एका पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता तसेच पक्षासाठी इच्छूकांमधून सर्व संमतीने एकच उमेदवार देऊन विरोधी उमेदवाराचा पराभव करण्याच्या शिवसैनिकांच्या निर्धारायामुळे दापोलीतील शिवसेनेचे अस्तित्व अबाधित असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांची तोफ चांगलीच धडाडली. विकासाची भाषा करणारे आज सर्वत्र दिसतात, पण ज्या मतदारसंघात स्वतःचे नेतृत्व मंत्रीपदी आहे, त्या भागातील रस्ते आणि सुविधांची अवस्था आजही बिकट आहे. पैशाने निवडणुका जिंकल्या जातात; पण लोकांची मने मात्र विचारानेच जिंकली जातात,” अशा शब्दांत शिवसेना नेते व आम. भास्कर जाधव यांनी विरोधकांवर तीव्र निशाणा साधला.
आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, आपल्या सर्वांच्या मनामध्ये जिंकून येण्याची विजयी होण्याची इर्षा आणि जोश निर्माण झाला पाहिजे. काही वाटेल ते झाले तरी मी ही लढाई हे युद्ध ही निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणारच. तो आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये तयार झाला पाहिजे. दापोलीत शिवसेनेशिवाय पर्याय नाही. जोमाने काम करा. इकडे तिकडे गेलेले लोक पुन्हा आपल्या सोबतच येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इव्हीएम घोटाळा , आमदार, खासदार विकत घेणे आता हे कमी कि काय म्हणून तुमचं मत ही चोरलं जातंय. भाजप पक्ष राहीलाच नाही आयाराम गयारामांचा भाजप पक्ष झाला आहे त्यामुळे त्यांच्याकडे विचार राहीला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List