फरीदाबादमध्ये दहशतवादाची फॅक्टरी, दिल्ली स्फोटाबाबत महत्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी कारमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जण जखमी झाले. या कटाचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर मोहम्मद देखील स्फोटात ठार झाला. मोहम्मद हा डॉ. मुझम्मिल शकीलचा मित्र होता आणि फरीदाबादमधील एका रुग्णालयात काम करत होता. पोलिसांनी उमरच्या पालकांना आणि दोन भावांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दिल्ली स्फोटाबाबत महत्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.
उमर मोहम्मद आणि डॉ. मुझम्मिल शकील दोघेही फरीदाबादमधील एका कारखान्यात बॉम्ब बनवत असत. बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या अमोनियम नायट्रेटचे गोदाम देखील फरीदाबादमध्येच होते. तपास यंत्रणांच्या मते, डॉ. उमर मोहम्मद हा कटाचा सूत्रधार होता. फरीदाबादच्या रुगणालयात असताना त्याने अनेक काश्मिरी तरुणांना आपल्या कारवायांमध्ये सामील करून घेतले. त्याचा एक साथीदार अजूनही बेपत्ता असून तो सध्या परदेश दौऱ्यावर असल्याचे तपासात उघड झाले आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी मुझम्मिलला ताब्यात घेतल्यानंतर डॉ. उमर मोहम्मदचा कट उघडकीस आला. डॉ. उमर स्फोट करण्यासाठी दिल्लीत आला नव्हता. त्याला पकडले जाण्याची भीती होती. त्यामुळे हा आत्मघातकी हल्ला होता की अपघाती स्फोट याबाबत तपास यंत्रणांनी अद्याप पुष्टी केलेली नाही.
दरम्यान, गृह मंत्रालयाने दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. एनआयए आता स्फोटाची सखोल चौकशी करत आहे. संशयितांच्या नेटवर्कचा शोध घेत जबाबदार असलेल्यांना अटक करत आहे. यासंदर्भात फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठातही शोध मोहीम राबवण्यात आली. लखनऊच्या इंटिग्रल विद्यापीठाशी संबंधित डॉ. परवेझ अन्सारी हा फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात संशयित म्हणून समोर आला आहे. परवेझ अन्सारीच्या गाडीवर इंटिग्रल विद्यापीठाचे स्टिकर सापडले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List