दिल्लीतील स्फोटाची घटना निषेधार्ह; जगभरातून शोक व्यक्त
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाने देश हादरुन गेला आहे. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट असून देशभरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेवर आता जगभरातून प्रतिक्रिया येत असून अनेक देशांनी ही निषेधार्ह आणि निंदनीय घटना असल्याचे सांगत या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
हिंदुस्थानातील अमेरिकन दूतावासाने दिल्ली स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने इंस्टाग्रामवर म्हटले आहे की, नवी दिल्लीतील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमींबाबत आम्ही शोक व्यक्त करत आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती आमच्या तीव्र शोक व्यक्त आहोत. जखमींच्या लवकर बरे होण्याकरिता आम्ही प्रार्थना करतो, असे अमेरिकेने स्पष्ट करत ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
चीनने मंगळवारी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी बीजिंगमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. त्यांनी पीडितांप्रती शोक व्यक्त केला, मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना हार्दिक सहानुभूती व्यक्त केली आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा दिल्या.
दिल्ली स्फोटाबद्दल रशियानेही शोक व्यक्त केला. हिंदुस्थानातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी इंस्टाग्रामवर म्हटले आहे की, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे मला धक्का बसला आहे. मला विश्वास आहे की सध्या सुरू असलेल्या सविस्तर चौकशीतून या घटनेचे कारण स्पष्ट होईल. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्याची इच्छा करतो, असे रशियाने म्हटले आहे.
श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, दिल्लीतील स्फोटाच्या बातमीने दुःख झाले.श्रीलंका भारतीय जनतेसोबत आहे. प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आमच्या संवेदना आहेत. हिंदुस्थानातील सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वोंग यांनी या प्राणघातक हल्ल्याचा निषेध केला आणि त्याला दहशतवादी कृत्य म्हटले. ते म्हणाले, लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटातील बळी आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या प्रार्थना आहेत. सिंगापूर या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि हिंदुस्थानसोबत एकता व्यक्त करतो.
हिंदुस्थानातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी ट्विटरवर म्हटले की, दिल्लीतील कार स्फोटानंतरचे फोटो अत्यंत वेदनादायक आहेत. मी मृतांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्याची इच्छा करतो. बचाव पथके आणि सुरक्षा दलांना सलाम. हिंदुस्थानातील इराणी दूतावासानेही दिल्ली स्फोटाबद्दल शोक व्यक्त केला. दूतावासाने म्हटले आहे की, आम्ही पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो. जखमींच्या लवकर बरे होण्याची आम्ही प्रार्थना करतो. याशिवाय ब्रिटन, अर्जेंटिना, फ्रान्स, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांनीही राजनैतिक माध्यमातून या घटनेवर दुःख व्यक्त करून हिंदुस्थानसोबत असल्याचे म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List