IPL 2024 – वानखेडेवर हार्दिक पंड्याची खिल्ली उडवल्यास पोलीस कारवाई होणार?
इंडियन प्रीमियर लीगमधील 14 वा सामना पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि एक वेळच्या विजेत्या राजस्थान रॉयल्स संघात वानखेडे मैदानावर रंगणार आहे. रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर मुंबई पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळणार आहे. या लढतीसाठी खेळाडू मुंबईत दाखल झाले असून सरावही सुरू आहे. वानखेडे मैदानावरही तयारी पूर्ण झाली आहे. मात्र या लढतीदरम्यान प्रेक्षकांकडून हार्दिक पंड्याची खिल्ली उडवली जाण्याची शक्यता आहे.
या लढतीआधी ‘पंड्याची खिल्ली उडवली तर पोलिसी कारवाईचा सामना करावा लागेल’, अशा आशयाच्या बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे क्रीडा चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधला असता यात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
‘मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स लढतीसाठी कोणतेही विशेष निर्देष देण्यात आलेले नाहीत. बीसीसीआयने मैदानावरील प्रेक्षकांच्या वर्तणुकीबाबत काही मार्गदर्शक तत्वे घालून दिलेले आहेत. त्या तत्वांचे पालन आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आम्ही करतो’, असे एमसीएच्या सूत्रांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List