‘काशिनाथाचं चांगभलं’च्या गजरात बावधनचे बगाड
‘काशिनाथाचं चांगभलं’च्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण राज्यात वैशिष्टय़पूर्ण मानली जाणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा उत्साहात पार पडली.
बावधन येथील भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कृष्णा नदीवर सोनेश्वर या ठिकाणी सकाळी आठच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर बगाडय़ा विकास तानाजी नवले (रा. शेलारवाडी) यांना कृष्णा नदीत विधिवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची विधिवत पूजा करण्यात आली. बगाडय़ाला वाजतगाजत बगाडाजवळ नेण्यात येऊन, त्याला पारंपरिक पद्धतीचा पोशाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते. सकाळी 10 वाजता कृष्णा नदीवरून बगाडाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बावधन गावासह 12 वाडय़ांच्या एकीचे दर्शन प्रामुख्याने झाले.
बगाडाचा गाडा ओढण्यास सकाळी दहाच्या सुमारास सुरुवात झाली. त्यानंतर ठिकठिकाणी विसावा घेऊन बैल बदलण्यात आले. बगाडाबरोबर वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि जोतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आले. वाई व परिसरातील हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद लुटला व दर्शन घेतले. भाविकांनी बगाडाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. शेतातून जाताना बगाड गाडय़ास एका वेळी 12 बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर चार बैल जुंपून बगाड ओढण्यात आले. बगाडाचे खिलारी बैल पाहण्यासाठी शेतकरी लांबून येतात. गाडा गावाच्या दिशेने जात असताना ठिकठिकाणी शिडाच्या पाच फेऱ्या काढण्यात आल्या. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बगाड गावात पोहोचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला.
बगाड परिसरात मुंबईच्या व स्थानिक विविध संस्था, मंडळांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व 108 ऍम्ब्युलन्स तैनात करण्यात आली होती. वाई विभागाचे महावितरणचे उपअभियंता पंकज गोंजारी आपल्या टीमसमवेत जातीने लक्ष ठेवून हजर होते. वाई नगरपरिषदेचे अग्निशमन बंब बावधन हायस्कूल येथे सज्ज ठेवण्यात आले होते.
बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कृषिभूषण’ शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, राजू कदम, मदन भोसले, विलास पिसाळ, प्रतापराजे भोसले, विक्रम पिसाळ आदी मान्यवर ध्वनिक्षेपकावरून सूचना देत होते. पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब बालचिम, वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उपनिरीक्षक कृष्णराज पवार, विजय शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पीएसआय व 60 पोलीस कर्मचारी, एक जलद कृती दलाची तुकडी तैनात करण्यात येऊन पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List