कथा एका चवीची – भाकरीचा चंद्र
>> रश्मी वारंग
उदरभरणापलीकडे रोटी, चपाती वा भाकरीचा इतिहास काही असो, आपले सगळे जगणे या रोटी, भाकरीच्या अर्ध किंवा पूर्ण चंद्राभोवती फिरते एवढे नक्की.
माणसाच्या गरजा किती? तर रोटी, कपडा और मकान. यातली रोटी वगळली तर जगणे अशक्य. रोटी, चपाती, पोळी, भाकरी नावे वेगवेगळी, पण गरज मात्र एकच पोटाची खळगी भरणे. या उदरभरणापलीकडे या रोटीचा इतिहास काय सांगतो?
इतर धान्यांच्या तुलनेत गहू तुलनेने अलीकडचा आहे. पण गव्हाचा वापर प्राचीन काळापासून हिंदुस्थानात होत असल्याचे दाखले मिळतात. सोमेश्वराच्या ‘अभिलषितार्थ चिंतामणी’मध्ये त्याने केलेले वर्णन पहा. गव्हाचे दळून पीठ करावे. त्यात थोडे तूप, मीठ घालून व दूध आणि पाणी घालून कणीक भिजवावी असे सोमेश्वर म्हणतो. याच कणकेत सारण भरून बनवलेल्या मांड्यांना सोमेश्वराने पहलिका किंवा पोलिका म्हटले आहे. पुरणपोळीचे हे आद्य रूप म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पोळी म्हणजे पुरणाची आणि चपाती म्हणजे गव्हाच्या पिठाची असे वर्गीकरण आढळते. पुरणपोळी, तेलपोळी, सांज्याची पोळी यांचे दाखलेदेखील सोमेश्वराच्या ग्रंथात मिळतात. पोळी हा शब्द महाराष्ट्रातच अधिकतर वापरलेला दिसतो. काही ठिकाणी पोळी, तर काही ठिकाणी चपाती उल्लेख होतो. मग नेमका यात भेद काय? तर कणकेचा छोटा उंडा करून आत तुपाचा हात लावून मग लाटली जाते ती पोळी आणि नुसतीच लाटली जाते ती चपाती असा भेद दाखवता येईल. चपटना, चपटून, लाटून केलेला पदार्थ म्हणजे चपाती असा या शब्दाचा उगम असावा असा अंदाज आहे. पण हिंदुस्थानातील सर्वच प्रांतांत चपाती असा शब्द आहे. अकबराच्या ‘ऐन-ए-अकबरी’मध्ये चपातीचा उल्लेख आढळतो.
सोमेश्वरच्या याच ग्रंथात कणकेचे गोळे हातावर पसरून विस्तवावर टाकून तांबूस होईपर्यंत भाजून ‘अंगारपोलिका’ करण्याची कृती सांगितली आहे. ही अंगारपोलिका म्हणजे आपला आजचा फुलका असावा.
पोळी, चपातीकडून आता रोटीकडे येऊ या. असे म्हणतात रोटीचा उगम पर्शियात झाला. प्रवासी मंडळींनी ताट व भांडी घेऊन फिरण्यापेक्षा असा पदार्थ बनवून पाहिला ज्यात भाजी ठेवून खाणे सोपे व्हावे. त्यातून जाडसर रोटी प्रचलित झाली. हिंदुस्थानावर झालेल्या आाढमणातून आणि प्रवाशांमुळे रोटी हिंदुस्थानी आहारात समाविष्ट झाली. गंमत म्हणजे रोटी हा शब्द संस्कृत ‘रोटिका’ या शब्दाचा अर्धभाग आहे. मैद्यापासून बनवल्या जाणाऱया रोटीऐवजी गेहू की रोटी मात्र अवध प्रांताचा शोध आहे. अवध प्रांतात गव्हाचे प्रचंड उत्पादन होत असे. त्यामुळे मैद्याऐवजी गव्हाचा वापर करून रोटी शेकली जाऊ लागली. हिंदुस्थानातील अनेक प्रांतांत वेगवेगळी पिके घेतली जातात. त्यानुसार त्या धान्य पिठांची जाडसर थापली जाते ती रोटी असा स्पष्ट शब्दप्रयोग आहे.
गुजरातीत जवारने बाजरोनो रोटलो असा उल्लेख होतो, पण मराठीत मात्र भाकरी असा शब्द आहे. हा शब्द कसा जन्मला याचा स्पष्ट उल्लेख नाही, पण प्रोटो इंडो आर्यन भाषेत भक्कार अर्थात ढेकूळ असा उल्लेख आहे. त्यामुळे थोडीशी खरबरीत ती भाकरी असा अर्थ काढता येतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, गुजरात या राज्यांत भाकरी बनते. महाराष्ट्रात गव्हाची पोळी किंवा चपाती आणि तांदूळ, ज्वारी, बाजरीची, मक्याची ती भाकरी.
कवी नारायण सुर्वे म्हणतात, “भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.” नाव आणि इतिहास काही असो, आपले सगळे जगणे या रोटी, भाकरीच्या अर्ध किंवा पूर्ण चंद्राभोवती फिरते एवढे नक्की.
(लेखिका आरजे व स्तंभोखिका आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List