व्यक्तीवेध – विवेकनिष्ठ मानवतावादी निसर्गपूजक
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
बोटावर मोजण्याइतके असे तज्ञ असतील की, जे त्यांचे मान्यताप्राप्त संशोधन समाजापर्यंत पोहोचण्यासाठी तळमळीने कार्य करतात. डॉ. माधव गाडगीळ हे अशा मोजक्या लोकांपैकी एक आहेत. पर्यावरणाच्या संदर्भात लोकांमध्ये जाणीव, संवेदनशीलता, कर्तव्यभावना निर्माण करणे आणि पर्यावरणाच्या संदर्भात जबाबदारीची जाणीव करून देण्याचे काम तसेच ‘पर्यावरणशास्त्र’ या विषयाचा प्रसार आणि त्याबद्दलचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य गेली पाच दशके अव्याहतपणे करत आहेत.
प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक प्रा. डॉ. माधव गाडगीळ (जन्म 24 मे, 1942, पुणे) विवेकनिष्ठ व्यक्तिमत्त्व तसे प्रसिद्धीपासून थोडे दूरच असते.
हिंदुस्थानमध्ये पर्यावरणसंदर्भात अधिकार वाणीने बोलणारे प्रा. डॉ. माधव गाडगीळ एकमेव ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. पर्यावरणाच्या संदर्भात लोकांमध्ये जाणीव, संवेदनशीलता, कर्तव्यभावना निर्माण करणे आणि पर्यावरणाच्या संदर्भात जबाबदारीची जाणीव करून देण्याचे काम तसेच पर्यावरणशास्त्राचा प्रसार आणि त्याबद्दलचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य गेली पाच दशके अव्याहतपणे करत आहेत. बोटावर मोजण्याइतके असे तज्ञ असतील की, जे त्यांचे मान्यताप्राप्त संशोधन समाजापर्यंत पोहोचण्यासाठी तळमळीने कार्य करतात. डॉ. माधव गाडगीळ हे अशा अगदी मोजक्या लोकांपैकी एक आहेत. ऋतुमान बदलले याचा अर्थ आपल्या जीवनशैलीच्या परिणामामुळे निसर्गचक्र बिघडले असे मानायला आपण तयार नाही, मात्र अनामिक आणि ढोबळ निष्कर्ष आपण काढत असतो. वास्तविक, पर्यावरणाचा संबंध थेटपणे त्या-त्या देशातील नागरिकांच्या आणि देशाची प्रगती, विकास आणि औद्योगिकीकरणाशी जोडलेला आहे.
युरोपीय देशांच्या मानाने हिंदुस्थानी संवेदनशीलता अत्यंत तोकडी आहे. तिथले नागरिक आपल्या जीवनशैलीचा विचार कार्बन पदचिन्हे (फुटप्रिंट) आणि निसर्गाचा ऱहास या दोन्ही दृष्टिकोनातून करतात हा आदर्श सर्वांनी घ्यावा.
हिंदुस्थान विकसनशील देश असल्यामुळे अनेक बाबतीमध्ये आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. तरीही वैयक्तिक जीवनामध्ये नागरिक जबाबदार दिसत नाहीत. शासकीय धोरणे तर त्याहून बेफिकीर आणि असंवेदनशील आहेत.
सप्टेंबर 2023 मध्ये त्यांचे गेल्या पन्नास वर्षांच्या कार्याची नोंद असलेले आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. ‘अ वॉक अप द हिल’ आत्मवृत्त म्हणजे पर्यावरणासंदर्भात त्यांनी केलेल्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा असलेले असलेला दस्तऐवज आहे. त्यांचा जीवनप्रवास आणि कार्य समजून घ्यायचे असेल तर नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे आत्मवृत्त वाचायला हवे.
डॉ. गाडगीळ यांचे कार्य बहुआयामी आहे. कारण पर्यावरण जागृती समाजाशी, अर्थकारणाशी, राजकारणाशी इतिहास आणि निसर्ग विज्ञानाशीही संबंधित आहे. त्यांचे संशोधन जीवशास्त्र, मानवी पर्यावरण शास्त्र, पर्यावरणीय इतिहास असे व्यापक आहे. समाजामध्ये सह-अनुभूती निर्माण करणे, करुणा आणि समभाव जागृती करणे हे काम करुण मातृहृदयी व्यक्तीच करू शकते. निसर्गासाठी वाटणारी समानुभूती आणि समवेदना हे डॉ. गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा आहे. त्यातूनच निसर्गरक्षणासाठी जिवापाड प्रयत्न ते करतात.
एक शिक्षक, संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक आणि निर्णय प्रक्रियेमध्ये ज्यांच्या शब्दाला मान आहे अशा डॉ. गाडगीळ यांनी आपली तळमळ केवळ लेख, वैज्ञानिक संशोधन (250 वैज्ञानिक लेख) लिहूनच व्यक्त केली नाही, तर लोकसहभाग आणि चळवळी उभ्या केल्या. त्यांनी शासनाच्या पर्यावरणसंबंधी विविध प्रकल्पांवर अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पश्चिम घाटातील त्यांचे कार्य सर्वात उल्लेखनीय कार्य आहे. कर्नाटकमधील बांबू संरक्षण आणि संवर्धन प्रकल्प असेल किंवा निलगिरी बायोस्फियर प्रकल्प असेल, हे त्यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प होते. विविध प्रकल्पांवर त्यांचे मत आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरते. जंगल संसाधनावर आधारित उद्योगांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानावर त्यांनी निर्बंध आणले. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे.
डॉ. गाडगीळ हे विज्ञाननिष्ठ विवेकवादी व्यक्तिमत्त्व आहे. धर्म आणि जात ते मानत नाहीत, त्यांच्यावर त्यांचे वडील श्री. धनंजय आणि आई सौ. प्रमिला यांनी मानवतावादी संस्कार केले. डॉ. गाडगीळ यांना संस्कृत भाषा येते. त्यामुळे ऋग्वेद, रामायण, महाभारत हे मूळ ग्रंथ त्यांनी वाचले आहेत. इरावती कर्वे यांच्या साहित्यामध्ये त्यांना पर्यावरणशास्त्राची मुळे दिसतात, तर महाभारतामध्ये त्यांना मनुष्य आणि निसर्ग हा संघर्ष सापडतो हे विशेष! आदी अनादी काळापासून माणसाचा निसर्गाशी संघर्ष सुरू आहे. स्वतच्या अस्तित्वासाठी निसर्गाची पिछेहाट करणे हे मानवाला स्वतचा धर्म वाटतो, असे ते म्हणतात.
निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे हे सांगताना, भारतीय वन संरक्षण कायदे हे कालबाह्य आहेत हेही ते नमूद करतात. एकीकडे अभयारण्यातील हिंस्र प्राण्यांना खायला मांस उपलब्ध नसते, तर दुसरीकडे डुकरांचा सगळीकडे उपद्रव होतो. तेव्हा डुकरांची योग्य ती शिकार करता येईल अशा प्रकारचा कायदा व्हावा, ही मागणी
डॉ. गाडगीळच करू शकतात.
लहानपणापासून पर्यावरणाची आवड असणाऱ्या डॉ. गाडगीळ यांनी हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली, तिथेच प्राध्यापक म्हणूनही काम केले. हिंदुस्थानमध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरूमध्ये ते जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. डॉ. गाडगीळ यांना विविध मानांकित पदे भूषवण्याची संधी मिळाली. भारतीय पर्यावरणाच्या संदर्भातील समितीवर डॉ. गाडगीळ यांचे मत हे शेवटचे मत असते एवढा अधिकार त्यांनी प्राप्त केला आहे. त्यांनी पर्यावरण शास्त्राच्या संदर्भात अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. टायटलर, पद्मश्री आणि पद्मभूषण हे त्यांना मिळालेल्या अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांपैकी महत्त्वाचे पुरस्कार आहेत. नुकतेच जानेवारी 2024 मध्ये त्यांना पी. टी. थॉमस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. गाडगीळ म्हणतात, हिंदुस्थानमध्ये लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण व्हायला हवे, निसर्गाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List