साहित्य जगत- लेखक आणि सिनेमा
>> रविप्रकाश काकर्णी
चित्रपट आणि लेखक यांचे नाते म्हणजे ‘तुझे आणि माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना,’ असे म्हणण्यासारखे आहे. चित्रपट हे माध्यम दिग्दर्शकाचे आहे. त्याचे वर्चस्व सगळीकडे मानले जाते. त्यामुळेच चित्रपटात लेखकाला कायम दुय्यम स्थान मिळत आलेले आहे. त्यासंबंधात त्याचे असमाधानही लेखकांनी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. मग ते पु. ल. देशपांडे असतील, श्री. ना. पेंडसे असतील, नाहीतर ह. मो. मराठे. हे केवळ आपल्याकडेच आहे असे नाही तर पाश्चात्य देशातसुद्धा हाच अनुभव दिसतो.
एका पाश्चात्त चित्रपट दिग्दर्शकाने प्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिंग्वेला याबाबत विचारले तेव्हा हेमिंग्वे म्हणाला, “माझ्या कथा किंवा कादंबरीवर कोणीही चित्रपट केला तरी ते पाहण्याचे धाडस मी करत नाही. निर्मात्याकडून माझे मानधन मिळाले की माझा त्या चित्रपटाशी काहीही संबंध राहत नाही.” आपल्याकडे काय परिस्थिती आहे? तर हिंदीतील एका सुप्रसिद्ध लेखकाने एका मराठी लेखकाला विचारले, “माझी कथा हिंदी सिनेमावाले घेत आहेत. तुम्ही मला सल्ला द्या.” तेव्हा मराठी लेखक म्हणा, “कथा देऊन टाका आणि त्याचे लगेच पैसे घ्या. त्यानंतर आपण कुणा सिनेमावाल्याला चित्रपट काढण्यासाठी आपली कथा दिली आहे हे विसरून जा.” इथे सल्ला विचारणारे लेखक होते फणिश्वरनाथ रेणू आणि बहुमोल सल्ला देणारे होते. पु. ल. देशपांडे! तात्पर्य काय, तर सिनेमावाले लेखकाची पत्रास ठेवत नाहीत हेच खरे.
या अनुभवाला जबरदस्त तडाखा दिला तो सलीम-जावेद या जोडगोळी लेखकांनी. अर्थात सुरुवातीच्या काळात तेसुद्धा या अनुभवातून गेले असणार. पण ‘जंजीर’, ‘यादों की बारात’, ‘दिवार’ आणि शोलेच्या यशाने सिनेमावाल्यांनाही वाटायला लागले की, सलीम-जावेद म्हणजे परिस आहेत. ते म्हणतील ती पूर्वदिशा असे होऊ लागले. आपल्या लेखनात कोणीही फेरफार करायचा नाही असे ते आत्मविश्वासाने सांगू लागले. लेखकाच्या नावावर सिनेमा विकला जाऊ लागला. वांद्रे पुलावर सर्वप्रथम पोस्टर लागले…‘कमिंग सून, सलीम-जावेद प्रेझेंटस् दिवार.’
चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत होते. हे सगळे पुन्हा एकदा आठवायचे कारण ‘दऊत लेखणी’ या त्रैमासिकाचा (फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 24) विशेषांक. मराठी, हिंदी, ऊर्दू, इंग्रजी असा बहुभाषी अंक आहे. त्यामध्ये सिनेमॅटोग्राफीचा जादूगार गोविंद निहलानी यांची प्रदीर्घ मुलाखत अजय गंपावर यांनी घेतलेली आहे. निहलानी या गोष्टीला दुजोरा देत म्हणतात, “ सिनेमा क्षेत्रात साहित्यिकांचा आदर होत नाही, पण काही लेखक त्याला अपवाद आहेत. जावेद अख्तर, सलीम खान या लेखकांचे सिनेक्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. यांच्यानंतर गोष्टी बदलल्या. मात्र दुर्दैवाने यांच्या पिढीनंतर कोणीच तसं नाही. लेखकाच्या बाजूने विचार केला तर दुर्दैवाने हे मान्यच करावे लागेल की, साहित्यिकांच्या प्रतिभेचा सिनेमा क्षेत्रात म्हणावा तितका आदर केला जात नाही. लेखकाला चित्रपटाचे अधिकार मिळावेत यासाठी लढाई अद्याप सुरूच आहे.”
विजय तेंडुलकरांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे लेखन विशेष असल्याचे सांगून निहलानी एक अनुभव सांगतात, “विजय तेंडुलकर हे अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्व होते. जे पात्र ते लेखणीतून उभे करायचे, ते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसेच निभावायचे. आपल्या ज्ञानातून, अनुभवातून ते आपल्या पात्रामध्येही प्रामाणिकता आणायचे आणि त्यासाठी ते आग्रही असायचे. एक उदाहरण सांगतो. ‘अर्धसत्य’ जेव्हा तयार होत होता, तेव्हा त्याचा शेवटचा सीन ठरा होता. जसजसे सिनेमाचे शूटिंग पुढे गेले, तसतसे मला वाटायला लागले की, सिनेमाचा ठरवा शेवट, आणखी वेगळा करता येऊ शकतो. मात्र तेंडाकरांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. जे मी लिहिले आहे तसेच होईल असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले.” परंतु निहलानींनी त्यांना हवे असणारे शेवटच्या सीनचे शूटिंग केले आणि तेंडुलकरांना दाखवले. विशेष म्हणजे तेंडुलकरांनी निहलानींने त्यांच्या कल्पनेप्रमाणे केलेले शूट मान्य केले. लेखक-दिग्दर्शकांचे मतऐक्य झाले तरच असे होऊ शकते. पटले नाही तर लेखकालाच बाहेर पडावे लागते. एवढी किंमत द्यायला किती लेखक तयार असतात…?
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List