अभिव्यक्ती – ‘कलंकिनी राधा’ आणि कनु  हरामजादा

अभिव्यक्ती – ‘कलंकिनी राधा’ आणि कनु  हरामजादा

>> डॉ. मुकुंद कुळे

अभिजात साहित्यातील नायकनायिका कायमच आदर्श असतात. परिस्थितीवश त्या चुकीच्या वागल्याच तर त्यामागेही काही सूचकार्थ, पूर्वसंकेत असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे दोष जाणार नाही याची पुरेपूर तजवीज साहित्यकर्त्याने केलेली असते. परिणामी हे नायकनायिका जनमानसात प्रतिदेव, नव्हे देव म्हणूनच प्रस्थापित होतात. कदाचित तीही सर्वसामान्यांसारखी स्खलनशील माणसंच असतील, परंतु एक प्रकारे त्यांच्या प्रतिमेवर देवत्वाचा शेंदूर थापला जातो आणि हा शेंदूर खरवडून काढण्याचंच काम एक प्रकारे लोकसाहित्य करत असतं.

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध किंवा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पश्चिम बंगाल. सरंजामदारी-जमीनदारी पद्धती पूर्णपणे लयाला जात असण्याचा तो काळ. अशा काळात बालिका बधू बुलबुलचं लग्न तिच्यापेक्षा कित्येक वर्षांनी मोठय़ा असलेल्या जमीनदाराशी होतं. लग्न, शरीरसंबंध हे कळण्याचं तिचं वय नसतंच. साहजिकच नवऱ्याशी भावबंध जुळण्याऐवजी तिचे भावबंध जुळतात तिच्याशी खेळणाऱ्या, तिच्याच वयाच्या नवऱ्याच्या धाकटय़ा भावाशी, सत्याशी. वय लहान असताना हे नातं तसंच छान मोकळंढाकळं राहतं. मात्र वय वाढतं तसं नात्यातही बंधनं निर्माण होतात. तशीच ती बुलबुल आणि सत्याच्या नात्यातही निर्माण होतात. नकळत्या वयापासून उमललेलं हे अबोध प्रेम त्या दोघांपैकी थेट कोणीच व्यक्त करत नाही. तिच्या दिराच्या मनात काही असतं की नाही, कळत नाही. कदाचित त्याच्या दृष्टीने ती त्याची निव्वळ मैत्रीणच असते आणि राहतेही… परंतु तिच्या मनात मात्र त्याच्याबद्दल हळव्या भावना असतात आणि तिने फक्त आपल्या मनाला त्याची कबुली दिलेली असते. म्हणूनच तिला सतत त्याच्या सहवासाची-भेटीची अपेक्षा असते… आणि तिची ही ओढच तिच्या जावेच्या (बुलबुलच्या नवऱ्याच्या जुळ्या भावाची बायको, जी वयाने मोठी असते) नजरेतून सुटत नाही. एकदा बुलबुल उतावीळपणे सत्याला भेटायला जाते, तेव्हा ती सूचकपणे तोंडाने एक गाणं गुणगुणते –

की हो कलंकिनी राधा

कदम डाले बोशे आशे कनु हरामजादा

माई तुई जोले ना जय्यो, माई तुई जोले ना जय्यो

याचा अर्थ – अगं राधे, तू पाणी आणायला त्या कदंबतळी जाऊ नकोस. तिथे कदंबावर तो हरामजादा म्हणजेच लबाड कृष्ण टपून बसलेला आहे. तो तुला नादावेल आणि तू हकनाक कलंकिनी ठरशील. या गाण्याच्या पार्श्वभूमीवर बुलबुल आणि सत्याच्या नात्याकडे पाहिलं तर हे गाणं म्हणजे एकप्रकारे बुलबुलला दिलेला सावधगिरीचा इशाराच आहे की, तुझं लग्न झालेलं आहे आणि सत्या कितीही आवडला तरी तो तुझा दीर आहे. तू भले त्याच्यावर मोहित होशील, पण त्याने त्याचं काहीच बिघडणार नाही, कलंकित मात्र तूच होशील!

बुलबुलची जाऊबाई कारस्थानी असते. तिला बुलबुल आणि सत्याचं नातं ठाऊक असतं आणि त्यामुळे ती या गाण्याच्या ओळी कुत्सितपणेच आळवत असते. परंतु तिने गुणगुणलेल्या या दोन ओळी राधेप्रमाणेच बुलबुलचीही दिशा आणि दशा अधोरेखित करतात. मात्र एवढय़ा सूचक असलेल्या या दोन ओळींवरूनच काही वर्षांपूर्वी सनातन्यांनी अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘बुलबुल’ सिनेमाला प्रचंड विरोध केला होता. अगदी अनुष्काला ट्रोल करण्यापासून ते ‘बुलबुल’वर बंदी आणण्याची मागणी करण्यापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी तेव्हा केल्या. कारण त्यांचा आक्षेप होता की, सिनेमातील या गाण्यात राधेला ‘कलंकिनी’ आणि कृष्णाला ‘हरामजादा’ म्हटलंय नि त्यामुळे आमच्या भावना दुखावल्यात.

जर खरोखरच त्या गाण्यावरून तेव्हा सनातन्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माझ्या दृष्टीने याचा अर्थ एवढाच की, या सनातन्यांना लोकभावना बिलकुल कळत नाहीत. त्यांनी एकदा आपल्या लोकवाङ्मयाची पानं नीट चाळून बघावीत. तिथे त्यांना आपल्या देवतांविषयी लोकमानसाने धीटपणे व्यक्त केलेलं काय काय सापडेल. अभिजात साहित्य आणि लोकसाहित्यात हाच फरक असतो.

रामायण-महाभारतासारखी आर्ष महाकाव्यं असतील किंवा कालिदासादी कवींनी संस्कृतात लिहिलेली विदग्ध खंडकाव्यं-नाटकं असतील, या अभिजात साहित्याचं प्रयोजनच मुळी उत्तम अभिरुची घडवणं, आदर्शवाद मांडणं आणि नैतिकतेचे धडे देणं हे असतं. एक प्रकारे नीतिवान समाज घडवण्याचा ठेकाच अभिजात साहित्याने घेतलेला असतो. परिणामी मूळ कथा, आख्यान, उपाख्यान अशा अभिजात साहित्यकृतीतील घाटातून वाचकांवर एक प्रकारे संस्कार केले जातात. महत्त्वाचं म्हणजे अभिजात साहित्यातील नायक-नायिका कायमच आदर्श असतात. परिस्थितीवश त्या चुकीच्या वागल्याच तर त्यामागेही काही सूचकार्थ, पूर्वसंकेत असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे दोष जाणार नाही याची पुरेपूर तजवीज साहित्यकर्त्याने केलेली असते. परिणामी हे नायक-नायिका जनमानसात प्रतिदेव, नव्हे देव म्हणूनच प्रस्थापित होतात. कदाचित तीही सर्वसामान्यांसारखी स्खलनशील माणसंच असतील, परंतु एक प्रकारे त्यांच्या प्रतिमेवर देवत्वाचा शेंदूर थापला जातो.

…आणि हा शेंदूर खरवडून काढण्याचंच काम एक प्रकारे लोकसाहित्य करत असतं. ते देवदेवतांना ‘लोक’ म्हणूनच सादर करतं. माणूस म्हणून असलेल्या सगळ्या कसोटय़ा लोकसाहित्य या देवदेवतांना लावतं. जे आपलं जगणं, तेच या देवदेवतांचं जगणं. जे लोक खातात, तेच त्यांचा देव खाणार आणि माणूस चरित्रहीन असेल तर त्यांचा देवही तसाच असणार. या अर्थाने लोकसाहित्य-लोकवाङ्मय म्हणजे एक प्रकारे कायमस्वरूपी वास्तववादच आहे. या देवदेवतांना दोष देण्याचा त्यांचा हेतू नसून उलट तू आमच्यापेक्षा वेगळा नाहीस, असंच त्यांना सांगायचं असतं. म्हणूनच देवतांनाही आपल्या पातळीवर आणून त्यांच्या माध्यमातून आपली सुखदुःखं व्यक्त करण्याचा प्रयत्न त्या-त्या वेळच्या लोकमानसाने केला. त्यातूनच त्यांनी राम-कृष्णासकट, विठोबा-खंडोबापर्यंत सगळ्या देवदेवतांवर प्रेम केलं, वेळप्रसंगी त्यांना धारेवरही धरलं. कारण त्यांच्यासाठी ती सामान्य माणसंच होती. अलौकिक नाही, तर लौकिक व्यक्ती. म्हणून तर जनाबाई विठोबाला म्हणू शकली,

तुझी रांड रंडकी झाली, जन्मसावित्री चुडा ल्याली

तुझे गेले मढे, तुला पाहून काळ रडे…’

किंवा गर्भार सीतेला वनवासात पाठवल्याबद्दल ग्रामीण आयाबाया रामाला दोष देतातच की! अगदी रुक्मिणी-विठोबा-जनाई आणि म्हाळसा-खंडोबा-बाणाई यांच्या नात्याकडेही जनमानसाने प्रेमाचा त्रिकोण म्हणूनच पाहिलं. देव तसे वागले म्हणून माणसं तशी वागली म्हणण्यापेक्षा स्त्री-पुरुष या नैसर्गिक नात्यात कधीही काहीही घडू शकतं आणि माणूस त्या-त्या वेळी कसा वागेल हे सांगता येत नाही म्हणून त्या माणसांचे देवही त्यांच्यासारखेच वागतात किंवा वागले. लोककथा आणि लोकगीतांनी समृद्ध असलेलं लोकवाङ्मय पाहिलं तर त्यात देवांसाठी जशा ओव्या आहे, तशाच शिव्याही आहेत. त्याने हबकून जाण्याचं काहीच कारण नाही!

ज्या बंगाली गाण्यावरून सनातन्यांनी किंवा संस्कृतीच्या ठेकेदारांनी आता रान उठवलं, ते गाणंही बंगालमधलं प्रसिद्ध लोकगीतच आहे आणि वर्षानुवर्षे बंगालमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठावर ते गायलं जात आहे. बंगाली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बाऊल या लोकपरंपरेतील ते एक प्रसिद्ध बाऊल गीत आहे.

महत्त्वाचं म्हणजे गेली किमान दोनेकशे वर्षं हे गाणं बंगालात खुल्या दिलाने म्हटलं जात आहे. आजवर त्याच्यामुळे कोणाच्याही भावना दुखावलेल्या नाहीत आणि दुखावल्याही जाणार नाहीत. कारण तो राधा-कृष्णाच्या रासक्रीडेचाच एक प्रकार आहे. त्यात एकमेकांवर ज्या उत्कटपणे प्रेम केलं जातं, त्याच उत्कटतेने शिव्याही दिल्या जातात… आणि केवळ बंगालीच कशाला, ब्रज-मैथिलीपासून हिंदी-मराठी भाषेतही राधा-कृष्णाला दोष देणारी, नावं ठेवणारी गाणी आहेतच की! आपल्याकडे महाराष्ट्रात शुभकार्याप्रसंगी देवीचा गोंधळ घातला जातो. या गोंधळ परंपरेत सादर होणाऱ्या ‘जांभूळ आख्याना’तील राधाविलास गवळण बघितली तर त्यात राधा-कृष्णाच्या शारीर संबंधाचे उल्लेख आढळतात. शेवटी राधा ही लग्न झालेली होती आणि म्हणूनच त्या काळात तिच्यावरही काही दोषारोप ठेवले गेले असतीलच. त्याशिवाय का…

‘राधा-कृष्णाचं हे नातं, गावात होतोया बोभाटा, अनयाची राधा मोठी, कृष्णसखा गं धाकुटा’ अशी गाणी जन्माला आली असती? आणि मुळात राधा-कृष्णाच्या नात्याला तरी नाव का ठेवा? या लौकिक नात्याचं अलौकिकीकरण करून त्याला भक्तिभाव-अध्यात्माचं अवगुंठन कशासाठी चढवायचं? त्यांचं शारीर प्रेम आपण का मान्य करायचं नाही? लोकमानसाने ते केव्हाच मान्य केलेलं आहे. म्हणून तर राधा-कृष्णाच्या नात्याकडे, त्यांच्या प्रेमाकडे संशयाने पाहणाऱ्या ओव्या-गाणी ढीगाने सापडतात. तसंच अनयाशी लग्न झालेलं असतानाही कृष्णाला भेटायला जाणारी, त्याला समर्पित होणारी राधाही मोकळीढाकळी होतीच की! मग राधेला ‘कलंकिनी’ आणि कृष्णाला ‘हरामजादा’ म्हटलं म्हणून गळे कशाला काढायचे?

मुळात राधेला ‘कलंकिनी’ आणि कृष्णाला ‘हरामजादा’ म्हणताना हे गीत रचणाऱ्या लोकगायकाला आणि आजही ते आवडीने म्हणणाऱ्या कुणाचाही राधा किंवा कृष्णाला दोष देण्याचा मुळीच हेतू नाही. उलट हे गाणं म्हणजे राधा-कृष्णाच्या नात्यात रंगलेल्या रासक्रीडेचाच प्रगल्भ आविष्कार आहे… लोकवाङ्मय म्हणजे नेहमीच काही भक्तांनी-लोकांनी केलेला थेट विद्रोह नसतो. देवतांची आपल्याप्रमाणे मनुष्यपातळीवर कल्पना करून त्यांच्यावर आपले भाव-इच्छा लादणं हा त्यांचा एक प्रकारे व्यक्त होण्याचाही मार्ग असतो.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;