अभिप्राय- मुलांच्या मनाचं फुलपाखरू
>> डॉ. के. अनिल
अनुदिन प्रकाशन, परभणीतर्फे नुकताच प्रसिद्ध झालेला ‘फुलपाखरू’ हा मुलांसाठी लिहिलेला व मोठ्यांना अंतर्मुख करायला लावणारा बाल काव्यसंग्रह आहे. मोबाइलच्या आहारी गेलेल्या आजच्या मुलांना काहीतरी सकस मनोरंजनात्मक वाचायला, म्हणण्यासाठी काही छान छान गाणी कविता आवश्यक आहेत. त्याची पूर्तता हा काव्यसंग्रह करतो. मुलांच्या बडबड गीतांनीच मुले घडतात आणि आनंदाने बागडतात. ‘चांदोबा चांदोबा लपलास का’, ‘नाच रे मोरा’, ‘सांग सांग भोलानाथ’ ही गीतं सर्वांच्या ओठांवर आहेत. एखादं गाणं व त्याला सुंदर चाल असेल तर पिढ्यान्पिढ्या एखादं गाणं लोकप्रिय होतं.
फुलांच्या बागेत जसं फुलपाखरू स्वच्छंद हिंडतं तसंच मुलांच्या मनात त्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी मोठ्यांना भ्रमंती करावी लागते. ती भ्रमंती मुलांच्या भावविश्वात डोकावून तुकाराम खिल्लारे यांनी केली आहे. सोप्या शब्दांतून गहन अर्थ त्यांनी मुलांना सांगितला आहे. मुलांच्या साहित्याचा दर्जा ते साहित्य त्याला किती ऊर्जा देते यावर अवलंबून असतं. या संग्रहात एकूण 45 काव्य आहेत. काही प्रातिनिधिक कवितांचा येथे ऊहापोह करणे योग्य होईल. ‘अभ्यास खरा’ या कवितेचा आशय खालीलप्रमाणे…
अभ्यास सोडून वाचन अवांतर
मनाला देई आनंद निरंतर
कविता गोष्टी आवडती किती
नेहमी नेहमीच भूगोल भूमिती…
आज मुलांचे वाचन कमी होत चालले आहे. त्यातल्या त्यात अवांतर वाचन करण्याची संधी त्यांना मिळत नाही. म्हणून अवांतर वाचनाचे महत्त्व यात सांगितले आहे. यातील प्रत्येक कवितेने एक संदेश दिला आहे. फुलपाखराला जसं बागडायला अवकाश लागतं, तसंच मुलांना ‘आई’ नावाचं आकाश लागतं. हसत, खेळत, बागडत निसर्ग समजून घेतला तरच मुलांना जगण्याचे मूल्य कळेल. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ मुलांचे मन आकृष्ट करून घेण्यासारखे आहे. या कवितांना चांगल्या चाली लावल्या तर मुलांच्या ओठी ही गाणी रुळतील व जे रुळतं तेच रुचतं व रुजतं.
फुलपाखरू तुकाराम खिल्लारे
प्रकाशक : अनुदिन प्रकाशन, परभणी मूल्य : 80 रुपये
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List