मनतरंग – दुर्गा तू!
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘मी असहाय्य’ या विश्वास प्रणालीवर आधारलेल्या हानीकारक नकारभावनेतून बाहेर पडायचं तर आधी स्वतच स्वतची मदत केली पाहिजे. आपलं मन आपणच ओळखू शकलो नाही तर इतरांकडून आपण कशी अपेक्षा करावी? स्वतबाबत सतत हीनभावना ठेवल्याने नाजूक झालेल्या मनाला योग्य उपचारांची आणि मार्गदर्शनाची गरज असतेच, तीही योग्य वेळेत.
रजनीताई (नाव बदलले आहे) या मध्यमवयीन गृहिणी. वृत्तीने अत्यंत खेळकर, प्रेमळ आणि साध्यासरळ अशा होत्या. त्यांचा पंधरा वर्षांचा संसार तसा बघायला गेला तर सुरळीत चालला होता. घरी त्या, त्यांची मुलगी आणि नवरा अशी इनमिन तीन माणसे होती. सुखवस्तू कुटुंब असल्याने पैशांचीही ददात नव्हती. तरीही रजनीताईंना रात्रीची झोप तशी नव्हती. रात्र-रात्र त्या तळमळून काढत.
“काय सांगू मॅडम? मला रात्रीची गाढ झोप यावी म्हणून मी स्वतला दिवसभर इतकी बिझी ठेवते की, विचारू नका. सकाळचा वॉक घेते. दिवसभर कामाचा उपसा असतोच. दुपारी फक्त अर्धा तास झोपते. तीही झोप समाधानाची नाहीच. कंटाळा येतो हल्ली मला, डोकं सतत जड असल्याचं जाणवतं आणि पोटही. मला आठवतही नाही की, मी शेवटचं गाढ कधी झोपलेले ते”, असं म्हणून रजनीताई कुठल्या तरी विचारांत हरवल्या. काळजी, चिंता त्यांच्या चेहऱयावर स्पष्ट जाणवत होत्या.
“तुमचं वैवाहिक जीवन कसं सुरू आहे?” असं विचारताच “छान!” असं त्या म्हणाल्या. “आमचं लव्ह मॅरेज. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत सीईओ आहे. चांगलं चाललंय आमचं. तो त्याच्या मित्रांमध्ये, त्याच्या बहिणींमध्ये खूष, तर मी माझ्या मुलीबरोबर खूष” असं म्हणत रजनीताई खेदाने हसल्या. “मॅडम, मी काही गोष्टी स्वीकारल्या आहेत माझ्या नवऱयाबाबतीत” असं सांगत त्यांनी त्यांचा मनातला सल बोलून दाखवायला सुरुवात केली.
रजनीताईंना माहेर हे लग्नानंतर पारखे झाले होते. कारण त्यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला त्यांच्या घरून पराकोटीचा विरोध होता. तो विरोध पत्करून त्या सासरी आल्या खऱया, पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या कर्मठ आणि बुरसटलेल्या विचारांना कंटाळल्या. त्यात त्यांच्या मते नवऱयानेही त्यांना सांभाळून घेतले नाही. लग्नानंतर काही महिन्यांमध्ये त्यांना दिवस गेले आणि वर्षानंतर त्यांना मुलगी झाली. तिच्या पालनपोषणाची एकटीने घेतलेली जबाबदारी आणि सासरचे मानापमान यांत रजनीताईंची दमछाक व्हायची, पण त्या सहन करत होत्या. या सगळ्याचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम व्हायला सुरुवात झाली. सासरी त्यांना असुरक्षितता वाटायला लागली होती. सततच्या नकारात्मक, उदासीन वातावरणात त्याही तणावात जायला लागल्या होत्या, पण तो तणाव रजनीताईंनी कुणालाही बोलून दाखवला नाही. मुळातच संवेदनशील स्वभाव असल्याने त्यांना लहानसहान भांडणांचाही त्रास व्हायला लागला. त्यातच रजनीताईंना कळले की, त्यांच्या नवऱयाचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्या वेळी तर तणावात भर पडून त्यांचा धीर खचला, पण मुलीकडे पाहून त्यांनी हेही पचवले आणि आपल्या साथीदाराकडून असलेल्या अपेक्षाही संपवल्या.
रजनीताई आता मनाने एकट्या झाल्या होत्या. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे रजनीताईंना अतिविचारांनी ग्रासले आणि तिथूनच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सुरुवात झाली.
आज जवळपास दहा ते बारा वर्षे रजनीताई स्वतच्या मानसिक ताणतणावांशी झगडत आहेत. मुलीचे संगोपन या एकाच विचाराने त्या धीराने आल्या दिवसाला सामोऱया गेल्या खऱया; पण हा ताण त्यांचे शरीर आणि मन पोखरत गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, त्यांच्या नवऱयाने त्यांची जेव्हा एकदा घरी आलेल्या मित्रांसमोर “ही आमची सदान्कदा आळशासारखी लोळतच असते. आयतं खायला मिळतंय ना. रोज डोकं दुखल्याचं नाटक करायचं आणि ए.सी. लावून पडून राहायचं. नवऱयाच्या जिवावर मजा मारायची, दुसरं काय?” अशी त्यांची खिल्ली उडवली तेव्हा त्या कमालीच्या दुखावल्या गेल्या आणि त्याच वेळी त्यांनी स्वतसाठी समुपदेशन घेण्याचं निश्चित केलं.
“मला हे माहीत होतं की, माझी मदत माझ्याशिवाय कोणीही करू शकत नाही. अगदी नवराही नाही. मी त्याच्यावर जास्तच अवलंबून राहिले. अगदी त्याने माझं मन ओळखावं म्हणूनसुद्धा! पण मीच स्वत माझं मन ओळखू शकले नाही. अगदी जेव्हा माझ्या मनाला कुठल्या तरी मार्गदर्शनाचीही गरज होती तेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता ते अजूनच नाजूक झालंय. त्याला आता खरंच योग्य उपचारांची आणि मार्गदर्शनाची गरज आहे. प्लीज, हेल्प मी!” असं सांगताना रजनीताईंच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
त्यांच्या समुपदेशनाला सुरुवात झाली. सर्वप्रथम त्यांच्या हानीकारक अशा नकारात्मक भावनांचा (म्हणजेच स्वतची लाज वाटणे, अपराधीपणा, नैराश्य, पराकोटीचा संताप) समुपदेशन उपचारांच्या मदतीने निचरा कसा करावा आणि त्या पोषक अशा पद्धतीने ( दुःख वाटणे, खेद वाटणे, काळजी, राग) व्यक्त कशा कराव्यात यासाठी काही सत्रे घेतली गेली. ज्यामध्ये त्यांच्या विचार पद्धतीवर काम केले गेले, जी ‘मी असहाय्य’ या विश्वास प्रणालीवर आधारलेली होती.
रजनीताईंना त्यांना दिलेल्या सराव सत्रांचा फायदा होताना दिसत होता, पण ही प्रािढया हळूहळू होत होती. कारण मनात खोल रुतलेल्या आघातांवर काम चालू होते, पण मोठ्या धीराने त्या या सगळ्यांना सामोऱया जात होत्या. शेवटी त्याच स्वत स्वतला सांभाळून घेणार होत्या. एक दिवस रजनीताई सत्रात आल्या त्या पेढे घेऊनच. त्यांनी आता एका छोट्याशा ऑफिसमध्ये नोकरी स्वीकारली होती. मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी मुलाखत दिली आणि ऑफर लेटर घेऊनच बाहेर आल्या. “आता मी कधीही आयतं खाणार नाही मॅडम. हो ना!” असं सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले… आनंदाचे आणि काहीतरी गवसल्याचे. त्यांची झोप आता नक्कीच सुधारणार होती.
– [email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List