बारामतीतून सुनेत्रा पवार तर महादेव जानकर यांना परभणीचे तिकिट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शनिवारी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून तर महादेव जानकर यांना परभणीतून लोकसभेची उमेदवारी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. अगोदर जानकर यांना बारामतीतून उभे करण्यात येणार असल्याची चर्चा होती.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महायुतीत परभणीची जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आली असून आमच्या कोट्यातून ही जागा आम्ही राष्ट्रीय समाज पार्टीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. परभणीत रासपच्या वतीने महादेव जानकर हे उमेदवार असतील अशी घोषणाही तटकरे यांनी केली. एकमताने हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार गटाने याअगोदर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव आणि रायगडमधून सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सुनील तटकरे म्हणाले. आमच्याकडे पक्ष, चिन्ह आहे. विधानसभा अध्यक्षांनीही आमचाच पक्ष अधिकृत असल्याचे मान्य केल्याचेही तटकरे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List