पंकज अडवाणी, कॉजियर उपउपांत्यपूर्व फेरीत
अ.भा. सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक 2024 स्पर्धा
वृत्तसंस्था/ मुंबई
वर्ल्ड चॅम्पियन पंकज अडवाणी व इंग्लंडचा डेव्हिड कॉजियर यांनी सलग तिसरे विजय नोंदवत येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक 2024 स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
अडवाणीने गट अ मधील चुरशीच्या लढतीत मुंबईच्या रायन रझमीचा कडवा प्रतिकार मोडून काढत 603-418 असा विजय मिळविला. अडवाणीने 235 च्या ब्रेकने सुरुवात केली आणि नंतर 90 चा ब्रेक मिळवित विजय साकार केला. रायनने 93 व 124 गुणांचे ब्रेक्स नोंदवले. रायन पराभूत झाला असला तरी त्याने दोन विजय मिळवित उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
गट क मधील लढतीत इंग्लंडच्या कॉजियर अनेक वर्ल्ड टायटल्स जिंकणारा खेळाडू असून त्याने महाराष्ट्राच्या महेश जगदाळेचा 1168-418 असा एकतर्फी पराभव केला. कॉजियरने 203, 124, 160, 152, 162, 93, 70 अशा गुणांचे ब्रेक्स नोंदवले.
वर्ल्ड चॅम्पियनशिपचा उपविजेता सौरव कोठारी पुन्हा विजयपथावर आला असून गट फ मधील सामन्यात त्याने अनुभवी अलोक कुमारचा 889-200 असा पराभव केला. कोठारी व मुंबईचा रोहन जंबुसरिया या गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. गट ह मध्ये सिद्धार्थ पारिख व अरुण अगरवाल यांनीही आपापले शेवटचे सामने जिंकून आगेकूच केली आहे. सिद्धार्थने सलग तीन विजय नोंदवत गटात अग्रस्थान मिळविले. त्याने 183, 71, 96, 72 असे ब्रेक्स नोंदवत इंग्लंडच्या ख्रिस टेलरचा 671-254 असा पराभव केला. अगरवालने कनिश्क झांझरियावर 702-280 असा विजय मिळविताना 157, 61, 95, 79 असे ब्रेक्स नोंदवले. गट ई मधून कमल चावलाने रिषभ ठक्करला तर ध्रुव सितवालाने एस. रझमीचा पराभव करून आगेकूच केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List