उद्धव ठाकरेंकडून चोकलिंगम यांना निवेदन; बैठकीत काही मुद्दे अनिर्णित, सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या पुन्हा भेटणार; संजय राऊत यांची माहिती
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज दुपारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चोकलिंगम यांना निवेदन दिले.
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम ह्यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमधील घोळ तसेच मतदान प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्याची मागणी केली. ह्यावेळी… pic.twitter.com/94bt2hQZ80
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 14, 2025
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या बरोबर शिष्टमंडळाची प्रदीर्घ बैठक झाली. त्यानंतर एक आमचं शिष्टमंडळ हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना भेटले आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ही भेट घेण्यात आली. चोकलिंगम यांच्या बरोबरच्या बैठकीत काही मुद्दे अनिर्णीत आहेत. आणि ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे आणि चोकलिंगम यांची एकत्रित भेट घेऊन हे शिष्टमंडळ चर्चा करेल. त्यामुळे उद्या यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली जाईल, असे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या भेटीत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागतल्या मतदार यादीतले घोळ हे सांगण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आज सर्व विरोधी पक्ष महाविकास आघाडीतील आणि अन्य पक्षांचे सर्व प्रतिनिधी आज उपस्थित होते. कशा त्रुटी झालेल्या आहेत हे या भेटीत आम्ही चोकलिंगम यांना दाखवून दिलं. राज ठाकरे यांनी अनेक उदाहरणं सादर केली आणि पुराव्यानिशी दिलेली आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत प्रचंड गोंधळ आहे हे आता बऱ्याच मतदारसंघात दिसतंय. आणि तीच निवडणूक यादी जर १ जुलैला गोठवून त्या यादीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या तर तोच गोंधळ पुन्हा पुढे चालू राहील. आणि याला आम्ही आक्षेप घेतलेला आहे. राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी एकत्रित यावं आणि आमचं हे म्हणणं ऐकावं, ही आमची मागणी होती. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की, उद्या पुन्हा ते दोघं एकत्रित येऊन आमचं म्हणणं ऐकतील. आणि आम्ही जे पुरावे सादर केलेल आहेत त्याची पुन्हा चर्चा होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन; वाचा काय आहेत मुद्दे…
आमचा आग्रह हा आहे की, महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याआधी महाराष्ट्राच्या सर्व निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी दुबार मतं आहेत. एक नाव सहा-सहा ठिकाणी आहे. एकाच नावाच्या समोर वडिलांचं नाव, वय हे सगळं बघितलं तर ११७ वर्षांचं वय असणाऱ्या माणसाला ४० वर्षांचा मुलगा हे सगळं कुठल्याच तर्कात बसत नाही. घरांचे नंबर नाहीत, पत्ते नाहीत. त्याच बरोबर एकाच घरात १७० माणसं राहतात, अशी अनेक उदाहरणं आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीने घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, अशी मागणी आम्ही केलेली आहे. यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकण्याचं मान्य केलेलं आहे. उद्या पुन्हा ही बैठक होईल. व्हीव्हीपॅट लावलं पाहिजे, अशी आमची मागणी होती. राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता. या सगळ्याची चर्चा उद्या होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List